प्रायोगिक नाटकांना इतके भाडे परवडणारे नाही - वामन केंद्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 11:42 AM2023-09-03T11:42:41+5:302023-09-03T11:45:03+5:30
प्रायोगिक रंगभूमीसाठी उभारलेल्या थिएटरच्या भाड्याबाबत रंगकर्मींमध्ये नाराजी
पु. ल. देशपांडे कला अकादमीत प्रायोगिक रंगभूमीसाठी बांधण्यात आलेल्या नवीन थिएटरसाठी आकारण्यात येणाऱ्या भाड्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. सरकारने आकारलेले भाडे प्रायोगिक नाटकांना परवडणारे नसल्याचे काही रंगकर्मींचे म्हणणे आहे.
पु. ल. देशपांडे कला अकादमी स्थापन झाल्यापासून इथे प्रायोगिक रंगभूमीसाठी हक्काचे थिएटर असावे ही संकल्पना होती. त्यानुसार अकादमीच्या पाचव्या मजल्यावर २०६ आसनक्षमतेचे थिएटर बांधण्यात आले आहे. यासाठी प्रायोगिक नाटकाकरिता ८,५०० रुपयांपासून ९,५०० रुपयांपर्यंत भाडे निश्चित करण्यात आले असून, अनामत रक्कम ११,००० रुपयांपासून १३००० रुपयांपर्यंत आहे. हे भाडे प्रायोगिक रंगभूमीवर नाटके करणाऱ्यांना परवडणारे नसल्याने काही
रंगकर्मींमध्ये नाराजी आहे. रवींद्र नाट्य मंदिरातील मुख्य थिएटरमध्ये ९०० पेक्षा अधिक आसनक्षमता असूनही ५००० रुपये भाडे आहे, पण २०८ आसनांच्या थिएटरसाठी ८,५०० रुपये भाडे खूप जास्त असल्याचे नाट्यकर्मींचे म्हणणे आहे. या विषयावर 'लोकमत'शी बोलताना पद्मश्री प्रा. वामन केंद्रे म्हणाले की, प्रायोगिक रंगभूमीसाठी बांधलेले थिएटर प्रायोगिकसाठी वापरले जावे असे वाटत असेल तर इतके भाडे परवडणारे नाही. व्यावसायिक नाटकांप्रमाणे प्रायोगिक रंगभूमीला अनुदान मिळत नाही. वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या लोकांसाठी थिएटर सुरू करताना त्याचे भाडे नाटक करणाऱ्यांच्या आवाक्यात ठेवण्याचा विचार करायला हवा होता. प्रायोगिक रंगभूमीवर नाट्यकर्मींना स्वखर्चाने किंवा वर्गणीद्वारे नाटक करावे लागते. प्रायोगिक रंगभूमी समृद्ध झाली तर व्यावसायिक रंगभूमीही समृद्ध होईल. त्यामुळे मिनी थिएटरसाठी जसे २००० रुपये भाडे आहे, त्याच्याच आसपास या थिएटरमध्ये प्रायोगिक नाटकांसाठी भाडे आकारावे. चांगल्या सोयी-सवलती दिल्याचे सांगितले जात असले तरी जास्तीत जास्त तीन-चार हजार रुपये भाडे रंगकर्मींना परवडेल. यासाठी सरकारने हस्तक्षेप करून भाडे कमी करावे असे आवाहनही केंद्रे यांनी केले आहे.
संतोष रोकडे (प्रकल्प संचालक, पु. ल. देशपांडे कला अकादमी)
नवीन थिएटर अद्ययावत सोयीसुविधांनी सज्ज आहे. अशा प्रकारची मुंबईतील इतर थिएटर्स खूप महागडी आहेत. त्या तुलनेत पु. ल. देशपांडे कला अकादमीतील प्रायोगिक रंगभूमीचे थिएटर परवडणारे असल्याने भाडे कमी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आजवर ज्यांनी इथे प्रयोग केले त्यांनी कौतुकच केले आहे.