मनोरंजक मूल्यांच्या झगमगाटात झाकोळला इतिहास, काय म्हणतात जाणकार?

By संजय घावरे | Published: October 30, 2022 11:27 AM2022-10-30T11:27:21+5:302022-11-02T11:33:26+5:30

मागील काही वर्षांमध्ये इतिहासावर आधारलेले बरेच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटांनी चांगले यश मिळाल्याने सध्या ऐतिहासिक चित्रपटांची लाटच उसळली आहे...

experts expressed displeasure over historiacal movie | मनोरंजक मूल्यांच्या झगमगाटात झाकोळला इतिहास, काय म्हणतात जाणकार?

मनोरंजक मूल्यांच्या झगमगाटात झाकोळला इतिहास, काय म्हणतात जाणकार?

googlenewsNext

 मागील काही वर्षांमध्ये इतिहासावर आधारलेले बरेच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटांनी चांगले यश मिळाल्याने सध्या ऐतिहासिक चित्रपटांची लाटच उसळली आहे. यात प्रामुख्याने शिवकालीन इतिहासावर प्रकाश टाकणाऱ्या सिनेमांची निर्मिती होत आहे. या लाटेत खरा इतिहास वाहून जात असून मीठमसाला लावलेल्या कहाण्या प्रेक्षकांसमोर आणल्या जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

हिंदीलाही मागे टाकत काही ऐतिहासिक मराठी चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केली आहे. त्यामुळे सध्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील सिनेमांचा ट्रेंड जोरात आहे. या ट्रेंडमध्ये काही असेही सिनेमे येत आहेत ज्यातील ऐतिहासिक संदर्भांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली काहीही खपवले तरी चालते असे मानत काही जण इतिहासाची मोडतोड करत असल्याचा आरोप होत आहे. याबाबत पार्थ बावस्कर यांनी इतिहासाची कशी माती करण्यात आली ते चित्रपटांतील एकेक मुद्द्याद्वारे सांगितले आहे. प्रवीण भोसले यांनी स्पेशल व्हिडिओ बनवून निषेध नोंदवला आहे. एखादी कहाणी चित्रपटरूपात दाखवताना काही ठिकाणी एन्टरटेन्मेंट व्हॅल्यूजचा वापर करावा लागतो. हे खरे असले तरी याचा अतिवापर होत असल्याने खरा इतिहास जगासमोर येण्याऐवजी चुकीचे ऐतिहासिक चित्र दाखवले जात असल्याने याला आळा घालण्यासाठी सरकारने कायदेशीर धोरण आणणे गरजेचे असल्याची मागणी इतिहास अभ्यासक किमंतू ओंबळे सरकार यांनी केली आहे. इतिहासाचा अभ्यास असलेल्यांना लेखक-दिग्दर्शकांनाच चित्रपट बनवण्याची परवानगी सरकारने द्यावी तसेच ऐतिहासिक चित्रपटांसाठी सिनेमॅटीक लिबर्टी घेणे बंद करावे असेही ओंबळे यांचे म्हणणे आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्ज्वल्य इतिहास सांगणारी बरीच पुस्तके उपलब्ध असताना चुकीचे संदर्भ दाखवणे बरोबर नाही. केवळ गल्लाभरू वृत्तीने चुकीचे चित्र दाखवणाऱ्यांना इतिहास कधीच माफ करणार नाही असेही इतिहासतज्ज्ञ म्हणतात. महाराजांना हिरो दाखवण्याच्या नादात कित्येकदा महापराक्रमी शत्रूला मूर्ख दाखवले जाते. चित्रपटांमध्ये दाखवले जातात तसे मोघल राजे मुळीच मूर्ख नव्हते. महापराक्रमी असल्यानेच ते भारतीयांवर वर्चस्व गाजवू शकले. इतिहासातील हे कंगोरे येतील तेव्हा खऱ्या अर्थाने छत्रपतींची उंची आणखी वाढेल असाही एक मतप्रवाह लेखकांमध्ये आहे.
 
- प्रताप गंगावणे (पटकथा-संवादलेखक)

आजही महाराज मनामनांत जीवंत असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या विचारसरणीचा नीट अभ्यास केला जात नाही. काळ उभार उभारताना त्या काळातील संस्कृतीचा स्पर्श द्यायला कमी पडतो. महाराजांनी झोपडीतील मावळ्यांना संजीवनी देत घडवलेले नाट्य यायला हवे. प्रेक्षकांना गृहित धरून उगाच थरार आणण्यासाठी जे घडलेच नाही ते दाखवू नये.
.........................

- ओमकार वर्तले (गड-किल्ले अभ्यासक)

मनोरंजनाच्या नादात दिग्दर्शकांनी इतिहासाशी छोडछाड करता कामा नये. त्यामुळे चुकीचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचण्याची भीती आहे. पुस्तक संस्कृतीपेक्षा आज सिनेसंस्कृती अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचत असल्याने आपण जे चित्र दाखवतो आहोत त्यामुळे आपल्या पूर्वजांचा इतिहास डागाळला जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

Web Title: experts expressed displeasure over historiacal movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.