रंगभूषाकाराचे अनोखे रंगीबेरंगी पैलु

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2017 03:34 PM2017-01-08T15:34:40+5:302017-01-08T15:34:40+5:30

कृष्णा बोरकर यांच्या आजवरच्या प्रवासात व्ही. शांताराम, राजकमल स्टुडिओ, ज्येष्ठ रंगभूषाकार बाबा वर्दम यांचेही महत्त्वाचे स्थान आहे. एकदा ‘राजकमल’चे ...

Exquisite colorful color palette | रंगभूषाकाराचे अनोखे रंगीबेरंगी पैलु

रंगभूषाकाराचे अनोखे रंगीबेरंगी पैलु

googlenewsNext
ष्णा बोरकर यांच्या आजवरच्या प्रवासात व्ही. शांताराम, राजकमल स्टुडिओ, ज्येष्ठ रंगभूषाकार बाबा वर्दम यांचेही महत्त्वाचे स्थान आहे. एकदा ‘राजकमल’चे मुख्य रंगभूषाकार बाबा वर्दम आलेले नसताना बोरकर यांनी ‘राजकमल’मधील ज्येष्ठ अभिनेते बाबुराव पेंढारकर यांची रंगभूषा केली. शांताराम बापू यांनी ठीक आहे, अशा शब्दात पावती दिली आणि नंतर चक्क स्वत:ची रंगभूषा बोरकर यांना करायला सांगितली. पुढे ‘राजकमल’मध्येच साहाय्यक रंगभूषाकार म्हणून काही काळ त्यांनी नोकरी केली. ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’ ‘मौसी’ आदी चित्रपटांसाठी त्यांना साहाय्यक रंगभूषाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. काही वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी ‘राजकमल’ सोडायचे ठरविले व ते शांताराम बापूना भेटायला गेले. ‘नोकरी सोडून चालला आहेस. आता कुठेही साहाय्यक रंगभूषाकार म्हणून काम करू नकोस. उत्तम काम कर आणि काही अडले, गरज लागली तर पुन्हा ‘राजकमल’मध्ये ये’, अशा शब्दांत शांताराम बापू यांनी पाठीवर थाप मारून प्रोत्साहन दिल्याची आठवण बोरकर यांनी मनाच्या कोपऱ्यात अद्यापही जपून ठेवली आहे. ‘राजकमल’चीच निर्मिती असलेल्या व केशवराव दाते दिग्दर्शित ‘शिवसंभव’ या नाटकासाठी प्रमुख रंगभूषाकार म्हणून काम केले.
पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ‘पृथ्वी गोल आहे’ हे बोरकर यांचे स्वतंत्र रंगभूषाकार म्हणून पहिले व्यावसायिक नाटक. त्यानंतर प्रभाकर पणशीकर व मोहन वाघ यांच्यासमवेत त्यांनी ‘नाटय़संपदा’मध्ये काम केले. पुढे ‘नाटय़संपदा’मधून मोहन वाघ बाहेर पडल्यानंतर त्यांनी ‘चंद्रलेखा’ची स्थापना केली. नंतर बोरकर यांनी ‘चंद्रलेखा’च्या ‘गारंबीचा बापू’पासून ‘चंद्रलेखा’मध्ये ‘रंगभूषाकार’ म्हणून अनेक वर्षे काम केले. ‘चंद्रलेखा’च्या ‘गरुडझेप’, ‘स्वामी’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘गुड बाय डॉक्टर’, ‘रमले मी’, ‘दीपस्तंभ’ ‘गगनभेदी’ ‘रणांगण’ आदी नाटकांसाठी बोरकर हेच रंगभूषाकार होते. ‘रणांगण’ नाटकातील १७ कलाकार आणि ६५ प्रकारच्या रंगभूषा करण्याचे आव्हानही त्यांनी लीलया पेलले. ‘रंगशारदा’ ‘श्री रंगशारदा’ या नाटय़संस्थांमधूनही त्यांनी रंगभूषाकार म्हणून काम केले.  केशवराव दाते, बाबुराव पेंढारकर, नानासाहेब फाटक, मा. दत्ताराम, वसंत शिंदे , मधुकर तोरडमल, डॉ. काशिनाथ घाणेकर, यशवंत दत्त आणि अन्य दिग्गज कलाकारांची रंगभूषा बोरकर यांनी केली आहे.

Web Title: Exquisite colorful color palette

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.