२७ जुलैला ‘फांदी’ चित्रपटगृहात,या कलाकारांच्या आहेत भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 04:40 PM2018-07-23T16:40:14+5:302018-07-23T16:40:25+5:30

चुकीच्या गोष्टीला खतपाणी घालून  मूळ विषयाला बगल देत स्वत:च्या फायद्यासाठी संपूर्ण गाव या  कुटुंबाच्या पाठीमागे कसं लागतं ? हे या चित्रपटातून रंजकरित्या दाखवण्यात आलं आहे.

Fandi Marathi Movie Releasing On 27th July 2018 | २७ जुलैला ‘फांदी’ चित्रपटगृहात,या कलाकारांच्या आहेत भूमिका

२७ जुलैला ‘फांदी’ चित्रपटगृहात,या कलाकारांच्या आहेत भूमिका

googlenewsNext

समाजात काय घडतंय हे सिनेमातून दाखवलं जातं. आपल्याकडे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावर नेहमीच चर्चा सुरु असतात.  श्रद्धेचा गैरवापर करून त्याच बाजारीकरण करणा-या प्रवृत्तींवर प्रहार करणारा फांदी  हा चित्रपट २७ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ध्वज क्रिएशनची’ प्रस्तुती असलेल्या ‘फांदी’ या चित्रपटाच्या लेखनाची व दिग्दर्शनापर्यंतची जबाबदारी अजित  साबळे यांनी सांभाळली आहे.

एका कुटुंबाबत घडलेल्या घटनेचा गावक-यांनी लावलेला तर्क व त्यातून पुढे कुटुंबावर ओढवलेल्या  परिस्थितीचा  वेध घेत माणसांच्या भावना त्यांच्या मनोभूमिका या चित्रपटातून दाखवण्यात आल्या आहेत. चुकीच्या गोष्टीला खतपाणी घालून  मूळ विषयाला बगल देत स्वत:च्या फायद्यासाठी संपूर्ण गाव या  कुटुंबाच्या पाठीमागे कसं लागतं ? हे या चित्रपटातून रंजकरित्या दाखवण्यात आलं आहे.

समाजात चुकीच्या समजुतीपायी आजही अशा घटना घडतात हे दाखवण्याचा प्रयत्न करताना अंधश्रद्धेवर प्रहारही या चित्रपटातून करण्यात आलेला आहे. अरुण नलावडे, भूषण घाडी, नितीन आनंद बोढारे, संदीप जुवाटकर, विशाल सावंत, अमोल देसाई, बाबा करडे,  कुणाल विभुते, सतीश हांडे, फिरोज फकीर, भाग्यश्री शिंदे, स्नेहा सोनावणे, सुगंधा सावंत, चंदा जांभळे या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.

कथेला अनुसरून वेगवेगळ्या धाटणीची ३ गाणी या चित्रपटात आहेत. कुणाल-करण लिखित ‘देवा सांग ना तू कुठे गेला’, ‘मला भेटा ना दुपारी’, ‘किमया झाली गावामंदी’ अशी कथेला पूरक तीन गाणी या चित्रपटात आहेत. आदर्श शिंदे, बेला शेंडे, नागेश मोरवेकर या गायकांनी स्वरबद्ध केलेल्या या गीतांना कुणाल-करण यांनीच संगीतबद्ध केलं आहे. सायली शशिकांत पाटणकर या चित्रपटाच्या प्रस्तुतकर्त्या असून राजेश खारकर, सायली पाटणकर, महेंद्र सोमासे निर्माते आहेत. छायाचित्रण संजय बापू थोरात तर संकलन अनिल विठ्ठल थोरात यांचे आहे. कलादिग्दर्शन राहुल व्यवहारे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन गणेश सरवणकर यांचे आहे. भूषण आंगणे, मृणाली साबळे, विठोबा तेजस, अमोल देसाई, सचिन गायकवाड, जितेंद्र जे.बांभानिया, अनिल शिंदे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. समाजातील वास्तव मार्मिकपणे मांडत प्रेक्षकांना त्या वास्तवाची जाणीव करून देणारा  ‘फांदी’ २७ जुलैला प्रदर्शित होतोय.​

Web Title: Fandi Marathi Movie Releasing On 27th July 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.