नाट्यगृहांकडे रसिक वळताहेत पण...

By संजय घावरे | Published: February 12, 2023 06:07 PM2023-02-12T18:07:47+5:302023-02-12T18:09:04+5:30

प्रशांत-भरतच्या नाटकांना गर्दी; इतरांना सरासरी ६०% बुकिंग

Fans turn to theaters but… | नाट्यगृहांकडे रसिक वळताहेत पण...

नाट्यगृहांकडे रसिक वळताहेत पण...

googlenewsNext

कोरोनाच्या कठीण काळात अवकळा आलेली मराठी नाट्यसृष्टीची गाडी हळूहळू पुन्हा ट्रॅकवर येत आहे. ५० टक्के आसनक्षमतेमध्येही हाऊसफुल होणाऱ्या काही नाटके आजही गर्दी खेचत आहेत. त्यासोबतच इतर नाटकांनाही अंदाजे सरासरी ६० टक्के बुकिंग मिळत आहे. मागच्या वर्षाच्या अखेरच्या महिन्यांमध्ये आलेल्या नाटकांसोबतच यंदा आलेली नवीन नाटके रसिकांच्या मनात कुतूहल जागवण्याचे काम करत आहेत.

मागच्या वर्षी रंगभूमीवर आलेल्या '३८ कृष्ण व्हिला', 'चर्चा तर होणारच', 'यु मस्ट डाय', 'काळी राणी', 'सफरचंद', 'वाकडी तिकडी', 'चारचौघी' या नाटकांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. रसिकांच्या उदंड प्रतिसादाच्या बळावर '३८ कृष्ण व्हिला'ने अल्पावधीत १०० प्रयोगांचा टप्पाही पार केला आहे. अंशुमन विचारेच्या 'वाकडी तिकडी' या नाटकाचीही शतकी प्रयोगाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. रत्नाकर मतकरींच्या 'काळी राणी'ची चर्चा आहे. या नाटकांसोबतच नवीन आलेल्या नाटकांनाही रसिकांचा ५० ते ६० टक्के रिस्पॅान्स मिळत आहे. प्रणव रावराणे अभिनीत लेखक-दिग्दर्शक आनंद म्हसवेकरांचे 'तुझी माझी जोडी जमली' या नाटकाचा नुकताच शुभारंभाचा प्रयोग झाला आहे. यासोबतच मराठी रंगभूमीवरील लोककलेचा बाज असलेल्या नाटकांवर हुकूमत असलेला संतोष पवार आणि हृषिकेश जोशी 'येतोय तो खातोय' या नाटकाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. नुकत्याच रंगभूमीवर आलेल्या या नाटकाचीही जोरदार चर्चा आहे. याखेरीज लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे 'चलो एक बार फिर से' या नाटकाद्वारे एक अनोखा प्रयोग करत आहेत. प्रायोगिक रंगभूमीवर कौतुकास पात्र ठरलेले हे नाटक अष्टविनायकच्या साथीने त्याच कलाकारांसोबत व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचे शिवधनुष्य राजेश यांनी उचलले आहे. नवीन नाटकांच्या भाऊगर्दीत प्रशांत दामले आणि भरत जाधव यांची नाटके आजही आपला आब राखून असून, रसिकांना नाट्यगृहांपर्यंत आणत आहेत.

जोरदार तयारी सुरू...
सृजन क्रिएशन्स 'करुन गेलो गाव' हे नाटक पुन्हा आणत आहे. यात नवीन कलाकारांची फळी असेल. सध्या तालीम सुरू असलेले हे नाटक मार्चमध्ये रंगभूमीवर येईल. ६०० प्रयोग झालेले हे नाटक चार वर्षांनी परतणार आहे. पूर्वी वैभव मांगले साकारत असलेली भूमीका ओंकार भोजने  करणार आहे. सोबतीला भाऊ कदम, उषा साटम, प्रणव जोशी आहेत.
गौरी थिएटर्सच्या वतीने सध्या एका नवीन नाटकाची जोरदार तयारी सुरू आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांच्या दिर्ग्शनाखाली तयार होणाऱ्या या नाटकात संकर्षण कऱ्हाडे मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची माहिती मिळाली आहे. प्रशांत दामलेंच्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेल्या या नाटकाच्या शीर्षकापासून इतर माहिती सध्या तरी गुलदस्त्यात आहे. 

या नाटकांचा अल्पावधीतच रामराम...
थँक्स डिअर, छुपे रुस्तम, हसता हा सवता, गजरा मोहब्बतवाला
..........................
- राजेश देशपांडे (लेखक-दिग्दर्शक)
वर्कशॅापमधील मुलांना घेऊन व्यावसायिक नाटक करण्याचा नावीन्यपूर्ण प्रयोग 'चलो एक बार फिर से'च्या निमित्ताने करत आहोत. याचे सात प्रयोग झाले आहेत. नाव नसलेल्या कलाकारांना ग्लॅमर मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. सध्या रंगभूमीवर येणारी नवीन नाटके रसिकांना आवडत आहेत.
.........................
- दिलीप जाधव (निर्माते)
इतरांच्या जीवावर नाटके करणाऱ्यांनी थोडे तरी भान राखायला हवे. प्रेक्षक येत नाहीत अशी ओरड करण्यापेक्षा दर्जेदार नाटके आणावीत. शेवटचे प्रयोग सांगून प्रेक्षकांची दिशाभूल करता कामा नये. प्रेक्षक येत आहेतच. त्यात आणखी वाढ होईल, पण कंटेंटवर लक्ष द्यायला हवे. 
..........................
- गोट्या सावंत (नाट्य व्यवस्थापक)
नवीन लेखकांसोबतच कलाकारांनाही वाव मिळायला हवा. प्रेक्षक आणि रंगमंच यांच्यामध्ये असलेली तिसरी भिंत तोडून आज नाटक प्रेक्षकांच्या मांडीवर येऊन बसले आहे. चाकोरीबद्ध नाटकांचा काळ सरला आहे. लोकांची रुची बदलल्याने नावीन्यपूर्ण विषयांवरील नाटके येत आहेत.

Web Title: Fans turn to theaters but…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.