मराठीत मोगलीसारखी धम्माल करणार 'खिचिक'मधला 'फटफटी'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 02:53 PM2019-08-20T14:53:38+5:302019-08-20T14:54:19+5:30

आगामी खिचिक या चित्रपटातून हा मोगली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Fatfati from khichuk will do a fun like mowgli | मराठीत मोगलीसारखी धम्माल करणार 'खिचिक'मधला 'फटफटी'

मराठीत मोगलीसारखी धम्माल करणार 'खिचिक'मधला 'फटफटी'

googlenewsNext

आपण सगळ्यांनी हिंदीतला मोगली पाहिला असेल.. पण आता मराठीतही मोगली येऊ घातलाय.. हो.. विश्वास नाही बसत का? आगामी खिचिक या चित्रपटातून हा मोगली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आम्ही सांगतोय ते खिचिक या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या शौर्य उर्फ यश खोंड या बालकलाकाराविषयी.

मूळचा परभणीचा असलेला यश वडिलांच्या बिझनेसमुळे पुण्यात वाढला. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड. गणपतीमध्ये नक्कल करणं असो किंवा चित्रपटातले संवाद हुबेहुब म्हणून दाखवणं असो. यशने सगळ्यांची मन जिंकली. अभिनयासोबत नृत्याचीही आवड असलेल्या यशने डान्स क्लासमध्येही उत्तम प्रतिसाद मिळवला. *त्याच्या आई-वडिलांनी त्याला खूप मेहनतीने घडवलं आहे. याही बाबतीत असंच घडलं.* यशच्या अंगातले सुप्त गुण लक्षात आल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी त्याला अभिनय क्षेत्रातच पुढे नेण्याचा निर्णय घेतला.  त्यानंतर त्यांची भेट दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांच्याशी झाली. त्यानंतर यशने पुण्यातील अॅक्टप्लॅनेट अॅक्टिंग अॅकॅडमीमध्ये प्रितम सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या अभिनयामधील उणिवा भरून काढल्या व त्यानंतर प्रितम यांनी आपल्या आगामी येणाऱ्या "खिचिक्" चित्रपटासाठी यशची निवड केली व यशचा "खिचिक्" प्रवास सुरू झाला.

हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. यश साकारत असलेलं फटफटी नावाचं पात्र हे पारधी समाजातील एका लहान मुलाचं पात्र आहे. जो अतिशय खोडकर आहे आणि दिसायला थेट मोगलीसारखा आहे. त्याचं जीवनही बरंचसं मोगलीसारखंच आहे. जंगलात राहणं, मासोळ्या पकडणं आणि दिवसभर धुडगूस घालणं असे उद्योग हा फटफटी करतो. एक दिवस त्याच्या आयुष्यात एक खिचिक घटना घडते. मग नेमकं काय होतं. त्यातून या व्यक्तिरेखेचा प्रवास प्रितम पाटील यांनी उलगडला आहे. हे पात्र साकारण्यासाठी खूप मेहनत घेणं गरजेचं होतं. पण, प्रयत्नांची कोणतीही कसर यशने सोडली नाही. गुबगुबीत देहाच्या यशने या भूमिकेसाठी चक्क दहा किलो वजनही कमी केलं. पारधी समाजाची भाषा, त्यांचं जीवन, देहबोली हे सगळं काही तो अवघ्या चार महिन्यात शिकला. शहरात वाढलेला यश ते जंगलात राहणारा फटफटी असा प्रवास त्याने उत्तमरित्या साकारल्याचं सांगत दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी त्याचं कौतुक केलं आहे. 

प्रीतम एस. के. पाटील यांनी या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन केले आहे. नात्यांची अनोखी कथा या चित्रपटात आपल्याला पहायला मिळणार असून रसिक प्रेक्षकांना सहकुटुंब या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.अभिनेता सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, सुदेश बेरी, अनिल धकाते, शिल्पा ठाकरे, अभिनेत्री पॉला मॅकगिलीन, शीतल ढाकणे, रसिका चव्हाण, यश खोंड आदी कलाकारांचा अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहेत. खिचिक हे नाव अनोखं आहे, त्यामुळे प्रेक्षकांची चित्रपटाबाबती उत्सुकता कमालीची वाढली आहे. येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Fatfati from khichuk will do a fun like mowgli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.