'सासरे फक्त म्हणायला, होता तो मला बाबा पेक्षाही जवळचा', श्रीकांत मोघेंच्या आठवणीत प्रियाची भावनिक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 05:31 PM2021-03-10T17:31:40+5:302021-03-10T17:32:40+5:30
ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक श्रीकांत मोघे यांचे ६ मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमधून अष्टपैलू अभिनयाचे दर्शन घडविणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक श्रीकांत मोघे यांचे ६ मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाला काही दिवस उलटल्यानंतर आता त्यांची सून म्हणजेच अभिनेत्री प्रिया मराठे हिने सोशल मीडियावर श्रीकांत मोघे यांच्या आठवणीत भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
प्रिया मराठे हिने इंस्टाग्रामवर अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या निधनानंतर त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर केल्या. यावेळी तिने श्रीकांत मोघे यांचे फोटो शेअर करत लिहिले की, माझा बाबा! इतकं प्रेम , माझा नवरा सोडल्यास, क्वचितच कोणी माझ्यावर केल असेल.. "सासरे " फक्त म्हणायला, होता तो मला बाबा पेक्षाही जवळचा. "माझं पीयूडं" ," माझं लाडकं" अशी हाक मारत दोन्ही हात पसरून, मला मिठीत घ्यायचा. प्रयोग संपवून आले असले की "आज किती बुकिंग होतं, प्रयोग कसा झाला, पुढचा कुठे आहे " असे सगळे प्रश्न विचारायचा.
प्रियाने पुढे सांगितले की, बाबा आणि मुलाचं हे असं नातं ही मी पहिल्यांदाच पाहिलं. शंतनु बाबाचे गालगुच्चे घ्यायचा, त्याला प्रेमानी अक्षरशः चुर्गळून टाकायचा आणि ते बाबाला अत्यंत सुख देऊन जायचं.
गेली काही वर्ष तो व्हील चेअर वर होता पण तरी त्याच्या चेहेऱ्यावर मी कधीच, एका क्षणासाठी सुद्धा, उदासीनता नाही पाहिली, उलट आम्हाला लाजवेल इतका उत्सहच कायम पहिला. "मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे" हे धोरण मानून कश्यातच तो फार अडकला नाही.हा वाहणारा प्रेमाचा धबधबा थांबला.. पण माझ्या कुटुंबाच्या मनात त्याचं प्रेम आणि रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यात त्याचा ज्वलंत अभिनय कायमच जिवंत राहील, असे प्रियाने पोस्टमध्ये म्हटले.