'फत्तेशिकस्त'ला शिवकालीन संगीताचा साज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 02:51 PM2019-11-05T14:51:38+5:302019-11-05T14:54:26+5:30

यासाठी लोकप्रिय धनगरी ढोलाचा वापर करण्यात आला आहे. या सिनेमात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, वि. स. खांडेकर, दिग्पाल लांजेकर यांनी रचलेल्या गीतरचनांचा वापर करण्यात आला असून, संगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजी यांनी दिलं आहे.

Fatteshikast Marathi Movie Music Launch | 'फत्तेशिकस्त'ला शिवकालीन संगीताचा साज

'फत्तेशिकस्त'ला शिवकालीन संगीताचा साज

googlenewsNext


सुमधूर संगीत ही भारतीय सिनेमांची खासियत मानली जाते. मराठी सिनेसृष्टीमध्ये संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच ब्लँक अँड व्हाईटच्या जमान्यापासून आजच्या डिजीटल युगापर्यंतची फार मोठी संगीतमय परंपरा मराठीला लाभली आहे. कथेला अनुसरून गीत-संगीताची किनार जोडली जाणं हा त्यातील महत्त्वाचा पैलू मानला जातो. त्यामुळेच 'फत्तेशिकस्त' हा आगामी महत्त्वाकांक्षी सिनेमाही शिवकालीन संगीताचा साज लेऊन सजल्याचं सिनेरसिकांसोबतच संगीतप्रेमींनाही अनुभवायला मिळणार आहे. लेखन-दिग्दर्शनासोबतच 'फत्तेशिकस्त'मध्ये आपल्या अभिनयाची झलकही दाखविणाऱ्या दिग्पाल लांजेकरनं 'फत्तेशिकस्त'च्या माध्यमातून रसिकांसाठी जणू संगीताचा नजराणाच पेश केला असून संगीतकार देवदत्त मनिषा बाजी यांच्या दृष्टीतून तो प्रभावीपणे सादर झाला आहे.

 

'रणी फडकती लाखो झेंडे’... हे एक भव्य दिव्य गाणं 'फत्तेशिकस्त'मधील गाणं प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देणार आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेल्या या गाण्यात २०० नर्तक, मावळातील १००० कार्यकर्ते, २०० ढोलवादक आणि २०० ध्वजधारकांचा नृत्याविष्कार सादर करण्यात आला आहे. कोरिओग्राफर सुभाष नकाशे यांनी या गाण्याचं अप्रतिम नृत्य दिग्दर्शन केलं आहे. 'रणी फडकती...'ची आणखी एक खासियत म्हणजे हे गाणं सिनेमातील सर्व कलाकारांच्या आवाजात ध्वनीमुद्रीत करण्यात आलं आहे. 'फत्तेशिकस्त'मधील तुंबडी रसिकांच्या स्मरणात राहणारी ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात शाहिरी सादर करणारे अज्ञान दास यांचे १७ वे  वंशज असलेल्या हरिदास शिंदे यांनी ही तुंबडी गायली आहे. त्यामुळे 'फत्तेशिकस्त'मधील या तुंबडीला कळत-नकळत शिवकालीन वारसा लाभला आहे. कूट प्रश्नांच्या या तुंबडीच्या माध्यमातून त्या काळी महाराजांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम केलं जायचं. 

 

माऊलींच्या पूजेचा मान ज्यांच्याकडे आहे त्या अवधूत गांधी यांच्या स्वरातील ‘हेचि येळ देवा नका’... हे गीतही लक्षवेधी ठरणारं आहे. या कारुण्यपूर्ण अभंगाद्वारे ऑनस्क्रीन छत्रपती शिवाजी महाराज साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकरची एंट्री होणार आहे. महाराष्ट्रीय लोकपरंपरेचा अविभाज्य भाग असलेला जोगवाही 'फत्तेशिकस्त'मध्ये आहे. ‘तू जोगवा वाढ माई’... या जोगव्याचं वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे सर्व वीरांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. शिवकालीन इतिहासात मराठीइतकंच हिंदी आणि उर्दू शब्दांचा उच्चारही सर्रास केला जायचा. तोच धागा पकडत 'फत्तेशिकस्त'मध्ये हिंदी-उर्दूचा समावेश असलेल्या कव्वालीचा समावेश आहे. या सिनेमाला आधुनिकतेची किनार जोडत लोकपरंपरेचा वारसा लाभलेलं संगीत देण्यात आलं आहे. यासाठी लोकप्रिय धनगरी ढोलाचा वापर करण्यात आला आहे. या सिनेमात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, वि. स. खांडेकर, दिग्पाल लांजेकर यांनी रचलेल्या गीतरचनांचा वापर करण्यात आला असून, संगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजी यांनी दिलं आहे.

 

‘स्वराज्यातील पहिला सर्जिकल स्ट्राईक’ असं वर्णन केला जाणाऱ्या 'फत्तेशिकस्त'चं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकरनं केलं आहे. ए. ए फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्सची प्रस्तुती असलेला 'फत्तेशिकस्त' १५ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, मृण्मयी देशपांडे, अंकित मोहन, निखिल राऊत, हरीश दुधाडे,  समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, रुची सावर्ण, अश्विनी कुलकर्णी, नक्षत्रा मेढेकर, प्रसाद लिमये, अमोल हिंगे, ऋषी सक्सेना, सिद्धार्थ झाडबुके या मराठमोळ्या कलाकारांनी या सिनेमात विविध ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. अनुप सोनी हा हिंदीतला प्रसिद्ध चेहरा 'फत्तेशिकस्त'मध्ये शाहिस्ता खान साकारत मराठीकडे वळला आहे. 

या कलाकारांना पौर्णिमा ओक यांनी वेशभूषा केली असून, रंगभूषा सानिका गाडगीळ यांनी केली आहे. डीओपी रेशमी सरकार यांनी 'फत्तेशिकस्त'साठी सिनेमॅटोग्राफी करण्याचं धाडस केलं असून, यातील साहसदृश्यांचं दिग्दर्शन बब्बू खन्ना यांनी केली आहेत. संकलन प्रमोद कहार यांचं असून, ध्वनीलेखन निखील लांजेकर यांनी केलं आहे. अजय आरेकर यांची निर्मिती असलेल्या या सिनेमासाठी इल्युजन ईथिरीअल स्टुडियोज यांनी व्हीएएक्स केले आहेत. उत्कर्ष जाधव यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे.
 

Web Title: Fatteshikast Marathi Movie Music Launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.