घाशीराम काेतवालची पन्नाशी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 10:53 AM2022-12-18T10:53:23+5:302022-12-18T10:53:42+5:30
‘नाना फडणवीस’ यांची अजरामर भूमिका सादर करून ज्येष्ठ रंगकर्मी माधव अभ्यंकर यांना तीस वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्त ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाच्या त्यांनी उलगडलेल्या आठवणी.
- माधव अभ्यंकर, ज्येष्ठ रंगकर्मी
ष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले ’घाशीराम कोतवाल’ हे एक अद्वितीय सांगीतिक आणि राजकीय नाटक आहे. नाना फडणवीस, घाशीराम कोतवाल ही पात्रे रूपकात्मक आहेत. तेंडुलकर म्हणायचे की, हे ‘अनऐतिहासिक’ नाटक आहे. जे कालसुसंगत आहे. आजही त्याच पद्धतीचे राजकारण आपण बघतो. एखाद्याची गरज असते तेव्हा त्याला जवळ करतो. त्याची गरज संपली की, कुभांड रचून दूर करतो. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात हेच होत आहे. नाटक पाहिल्यानंतर मला ते खूप आवडले. यात नृत्य, संगीत, उत्कृष्ट अभिनय, असे सर्व काही आहे. त्यात तेंडुलकरांचे शब्द इतके समर्पक आहेत की, ते मनाला भिडले. नाटक पाहिल्यावर इतका भारावून गेलो की, या नाटकात काम करावे असे वाटले.
२२ मार्च २०२३ रोजी मला हे नाटक करताना ३० वर्षे पूर्ण होतील. नाटकाच्या व्यवस्थापनाची जबाबदारीही मी सांभाळत आहे. सुरुवातीच्या काळात थिएटर अकॅडमीने नाटक केले. तेव्हा शिवसेनेने उठाव केला होता. शरद पवारांनी परदेश दौऱ्यावर निघालेल्या कलाकारांना मदत केली. पनवेलपाशी गाडी अडवून कलाकारांना चोपून परत पाठविण्याचा प्लॅन झाला होता. तो पवारांनी हाणून पाडला होता. लोहगाव विमानतळावरून थेट सांताक्रूजला कलाकारांना उतरविले होते. तिथून परस्पर कलाकार मंडळी युरोपला गेली. पवारांनी नंतर हा किस्सा बाळासाहेबांना सांगितला.
मुळातच नाटक हे नाटक म्हणून पाहिले पाहिजे. हल्ली तर इतके संवेदनशील वातावरण आहे की, तुम्ही त्याबद्दल बोलू शकत नाही, उणीव काढू शकत नाही. कशाचाही संबंध जातीव्यवस्थेशी लावला जातो. आमच्या काळातही विरोध झालाच. तीन ते चार वर्षे झगडल्यानंतर मी काही वर्षांपूर्वी नानावाड्यात नाटकाचा प्रयोग केला, तेव्हा २०० पोलिसांची सुरक्षा होती. काही लोकांवर नजर ठेवण्यात आली होती. विजय तेंडुलकर आणि माझे, वडील मुलाचे नाते होते. मी त्यांना रंगीत तालमीला बोलवायचो. तेव्हा अगदी तंतोतत चाललेय. अगदी योग्य भूमिका करतोयस. ‘कीप इट अप’, असे जेव्हा त्यांनी मला सांगितले ती माझ्यासाठी खूप मोठी पावती होती. आवाजाचा, डोळ्यांचा विशिष्ट वापर माझा ‘प्लस पॉइंट’ ठरला. डॉ. मोहन आगाशे यांनीही ‘तू कुठेही माझी कॉपी केली नाहीस. तू तुझ्या पद्धतीने भूमिका केली’, ही त्यांनी दिलेली दाद सुखावून गेली. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी माझे नाटक तीनदा पाहिले आहे. मुख्यमंत्री असताना यशवंतराव चव्हाण यांनाही ते नाटक पाहायला घेऊन आले होते. आतापर्यंत १,२८० प्रयोग केले असून, लवकरच १,३०० चा पल्ला गाठणार आहोत.