चित्रपटनिर्मिती ही एकाकी कला- दिग्दर्शक मोहित टाकळकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 01:12 PM2021-09-24T13:12:46+5:302021-09-24T13:15:56+5:30
नॉर्वे बॉलिवूड फिल्म फेस्टिवलमध्ये धुमाकूळ घालणा-या ‘मीडियम स्पाइसी’ या मराठमोळ्या चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित टाकळकर यांच्याशी खास गप्पा...
मराठी, हिंदी, उर्दू आणि कन्नड नाट्यसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक मोहित टाकळकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीत नवी इनिंग सुरू केली आणि त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मीडियम स्पाइसी’ या पहिल्या चित्रपटाने नार्वे बॉलिवूड फिल्म फेस्टिवलमध्ये धुमाकूळ घातला. या पार्श्वभूमीवर नाटक ते चित्रपट या प्रवासाबद्दल त्यांनी अलीकडे ‘लोकमत’शी खास गप्पा मारल्यात. नॉर्वेच्या बॉलिवूड फिल्म फेस्टिवलमध्ये ‘मीडियम स्पाइसी’ला खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
‘मीडियम स्पाइसी’ हा मराठी सिनेमा असला तरी त्याला शहरीपणाचा बाज आहे आणि त्यामुळे जगभरातील प्रेक्षकांना तो अपील होणारा सिनेमा असल्याचे ते म्हणाले. चित्रपट हा स्वत: प्रेक्षक शोधतो, असं मी मानतो. पण फिल्म फेस्टिवलमध्ये जगभरातील सिनेप्रेमींची दाद ही तरीही महत्त्वाची असते. चित्रपट महोत्सवांच्या माध्यमातून आपली कलाकृती जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते. दिग्दर्शक म्हणून याचा आनंद वाटतो, असेही ते म्हणाले. नाटकानंतर चित्रपट बनवण्याचा अनुभव सांगतांना ते म्हणाले, नाटक एक जिवंत माध्यम आहे याऊलट चित्रपट एकदाच बनतो. एकदा चित्रपट बनला की, तुम्ही त्यात काहीही सुधारणा करू शकत नाही. मी स्वत: नाटक आणि सिनेमा वेगळा आहे असे मानत नाही. दोन्ही ठिकाणी कथा दाखवली जाते. पण नाटकांत सगळे कलाकार एकत्र असतात, एकाच रूममध्ये दोन महिने राहून अनुभव शेअर करत असतात. अगदी पडद्यामागचे लोकही अनुभव मांडत असतात. नाटकाची लहान मुलासारखी काळजी घेतली जाते. याऊलट चित्रपटात दिग्दर्शक हाच केंद्रस्थानी असतो. चित्रपट निर्मिती ही एक एकाकी कला आहे. शूटींग संपले की, कलाकार, कॅमेरामॅन सगळे आपआपल्या वाटेने जातात. उरलेलं काम एडिटर करतात. हा इतका एक फरक सोडला तर नाटक व सिनेमात फार काही फरक मला जाणवत नाही.
मोहित टाकळकर दिग्दर्शित ‘मीडियम स्पाइसी’ हा सिनेमा जीवनातील नातेसंबंध, प्रेम आणि लग्नसंबंधांवर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे. यात सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे यांच्यासह सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, नीना कुलकर्णी, रवींद्र मंकणी आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.