कल्याण फिल्म फेस्टीव्हलमध्ये चित्रपटांची मेजवानी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2016 02:50 PM2016-12-23T14:50:49+5:302016-12-23T14:50:49+5:30

आपल्या दिमाखदार आणि नेत्रदीपक आयोजनामुळे कल्याण शहराच्या नावलौकिकात भर घातलेल्या ‘किफ’ म्हणजेच कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला येत्या रविवारपासून सुरुवात ...

Films show at the Kalyan Film Festival | कल्याण फिल्म फेस्टीव्हलमध्ये चित्रपटांची मेजवानी

कल्याण फिल्म फेस्टीव्हलमध्ये चित्रपटांची मेजवानी

googlenewsNext
ल्या दिमाखदार आणि नेत्रदीपक आयोजनामुळे कल्याण शहराच्या नावलौकिकात भर घातलेल्या ‘किफ’ म्हणजेच कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला येत्या रविवारपासून सुरुवात होत आहे. हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार, गायकांच्या मांदियाळीबरोबरच विविध भाषांतील उत्कृष्ट सिनेमे कल्याणकरांना त्यात पाहायला मिळणार आहेत.

यंदाच्या फिल्म फेस्टिव्हलचे वैशिष्ट्य म्हणजे वातानुकूलित (एअर कंडिशन) तंबू उभारण्यात येणार असल्याची माहिती आयोजक संदीप गायकर यांनी दिली. 

यंदाचे हे तिसरे वर्ष असून आपल्या अतिशय नेटक्या आणि भव्य साजरीकरणामुळे पहिल्या वर्षापासून या सोहळ्याने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. येत्या २५ ते २९ डिसेंबर रोजी कल्याण पश्चिमेतील फडके मैदानावर हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी कट्यार काळजात घुसली, हाफतिकीट, किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी यासारख्या गाजलेल्या मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी, मल्याळम, गुजराती आदी भाषांतील उत्कृष्ट आणि दर्जेदार असे १५ चित्रपट पाहायला मिळणार आहेत. हे चित्रपट पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार  नसल्याची माहिती फेस्टिव्हलचे दिग्दर्शक विनोद शिंदे यांनी दिली. 


दिवसा दररोज ३ चित्रपट दाखवण्यात येणार असून संध्याकाळी सांगितिक आणि नृत्याच्या कार्यक्रमांची झक्कास मेजवानी पाहायला मिळणार आहे. अमृता नातू, ज्ञानेश्वर मेश्राम, रोहित राऊत, मंगेश बोरगावकर, हर्षवर्धन वावरे, आनंदी जोशी, सायली पंकज, सावनी रविंद्र यांच्यासारखे सुप्रसिद्ध पार्श्वगायक आणि पार्श्वगायिका त्यात आपली कला सादर करणार आहेत. तर प्रियदर्शन जाधव, भार्गवी चिरमुले, सिया पाटील, मनिषा केळकर, हेमलता बाने, मीरा जोशी, रिचा अग्निहोत्री, आशिष पाटील, विजय कदम, माधवी जुवेकर, प्रसाद खांडेकर, प्रभाकर मोरे, सुहास परांजपे, योगेश शिरसाट, श्याम राजपूत, पूजा नायक, शर्मिला शिंदे, स्मिता तांबे, नकुल घाणेकर, डीआयडी फेम प्रिन्स, युनायटेड किंगडम ग्रुप आदींचा परफॉर्मन्स पाहण्याची संधीही प्रेक्षकांना मिळणार आहे. 

मराठी चित्रपट सृष्टीतील आपल्या योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना तर हिंदी चित्रपट सृष्टीतील खलनायकाची भूमिका गाजवलेले रणजित यांना कार्यगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचेही दिग्दर्शक शिंदे यांनी सांगितले.

    २५ डिसेंबरला सकाळी कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयूक्त ई. रविंद्रन यांच्या उपस्थितीत टुरिंग टॉकीजचे (तंबूतील सिनेमा) आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत संध्याकाळच्या सांगितिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक संदीप गायकर यांनी दिली. तसेच आपण ज्या शहरात राहतो त्या कल्याण शहराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे आपले स्वप्न या फिल्म फेस्टिव्हलच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरत असल्याचेही गायकर म्हणाले. तर २५ ते २९ डिसेंबर असा ५ दिवस चालणाऱ्या या फिल्म फेस्टिव्हलच्या सोहळ्याचे जानेवारी महिन्यात ‘फक्त मराठी’ वाहिनीवर प्रक्षेपण केले जाणार असल्याची माहिती या चॅनेलचे बिझनेस हेड श्याम मळेकर यांनी यावेळी दिली. तसेच अशा प्रकारचा भव्य दिव्य फिल्म फेस्टिव्हल मुंबई सोडून इतर ठिकाणी होणे आणि लोकांनीही त्याला उत्स्फूर्त दाद देणे ही निश्चितच मराठी चित्रपटांच्या दृष्टीने कौतूकाची बाब असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Films show at the Kalyan Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.