अखेर सूरज चव्हाणच्या 'राजाराणी'वरील संकट टळलं, वकील वाजीद खान यांनी मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 07:03 PM2024-10-23T19:03:25+5:302024-10-23T19:04:01+5:30
Raja Rani Movie : 'राजाराणी' हा चित्रपट पहिल्या पासूनच चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट मुलामुलींना आत्महत्या करायला भाग पाडत आहे म्हणून हा चित्रपट बंद करावा अशी मागणी वकील वाजीद खान यांनी केली होती.
बिग बॉस मराठी सीझन ५चा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) नुकताच 'राजा राणी' (Raja Rani Movie) सिनेमातून रुपेरी पडद्यावर झळकला आहे. १८ ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला आणि प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असलेला 'राजाराणी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटात बिग बॉस जिंकून आलेला सूरज चव्हाण प्रमुख भूमिकेत आहे. 'राजाराणी' हा चित्रपट पहिल्या पासूनच चर्चेत आहे.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट मुलामुलींना आत्महत्या करायला भाग पाडत आहे म्हणून हा चित्रपट बंद करावा अशी मागणी प्रसिद्ध वकील वाजीद खान यांनी केली होती. यावेळी त्यांच्या मागणीवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती आणि सूरज चव्हाणच्या चाहत्यांनी सोशल मीडियामध्ये 'आय सपोर्ट सुरज चव्हाण आणि आय सपोर्ट राजाराणी चित्रपट' असा मोठ्या पद्धतीने पाठिंबा जाहीर केला होता. यावेळी निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी वकील वाजीद खान यांना विनंती केली की एकदा व्यवस्थित चित्रपट पाहा आणि आपलं मत कळवा. यावेळी वकील वाजीद खान यांनी चित्रपट पाहून निर्माते यांना फोन करून आपण चर्चा करून पत्रकार परिषद घेऊ अशी विनंती केली.
वाजीद खान यांनी मागितली माफी
पुणे येथे वकील वाजीद खान आणि राजाराणी चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे , दिग्दर्शक शिवाजी दोलताडे , प्रमुख अभिनेते रोहन पाटील यांनी पत्रकार भवन येथे एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी वकील वाजीद खान यांनी राजाराणी चित्रपटाचा अभिनेता सूरज चव्हाण आणि संपूर्ण चित्रपटाच्या टीमची जाहीर माफी मागितली. माझ्या गैरसमजातून व पूर्ण माहिती न घेता हे वक्तव्य करण्यात आले असून ज्यांची मन दुखावले असतील त्या सर्वांची माफी मागतो असे देखील वकील वाजीद खान यांनी सांगितले.
आमचा चित्रपट खरा आहे व आम्ही अतिशय जबाबदारी पूर्वक आणि अतिशय गरीब परिस्थिती मधून हा चित्रपट बनवला आहे असं चित्रपटाचे लेखक निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सांगितले व आमचा चित्रपट लोक स्वीकारत आहेत व प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे व लोक चित्रपटाला न्याय देतील असे देखील निर्माते गोवर्धन दोलताडे म्हणाले.