‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 10:08 AM2018-07-26T10:08:23+5:302018-07-26T10:08:57+5:30

‘सविता दामोदर परांजपे’ या गाजलेल्या नाटकावर चित्रपट करण्याचे बरेच दिवसांपासून मनात होते. सगळे योग जुळून येत हा चित्रपट साकारल्याचे, दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी सांगतात.

The first glimpse of the movie 'Savita Damodar Paranjape' | ‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित

‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित

googlenewsNext

उत्तम आशय-विषयासाठी मराठी सिनेमा ओळखला जातो. याच आशयाच्या प्रेमात हिंदीतले अनेक बडे स्टार्स असून अनेक जण मराठी चित्रपटांची निर्मिती करताहेत. या यादीत आता अभिनेता जॉन अब्राहम यांचे नाव दाखल झाले असून त्यांची पहिली निर्मिती असलेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ या मराठी चित्रपटाची पहिली झलक नुकतीच एका शानदार सोहळ्यात प्रकाशित करण्यात आली.

 

‘गेल्या काही वर्षांत मराठीत उत्तमोत्तम आशयाचे चित्रपट बनत आहेत. त्यामुळे मी स्वतःही एका मराठी चित्रपटाची निर्मिती करतोय याचा मला आनंद आहे. प्रादेशिक सिनेमांचं आशयावर भर देऊन काम करणं मला आवडतं. एका चांगल्या संकल्पनेसोबतच ताकदीचे कलाकार आणि उत्तम दिग्दर्शक या सगळ्यांमुळे वेगळ्या धाटणीचा ‘सविता दामोदर परांजपे’ प्रेक्षकांनाही आवडेल, असा विश्वास जॉन अब्राहम यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

‘सविता दामोदर परांजपे’ या गाजलेल्या नाटकावर चित्रपट करण्याचे बरेच दिवसांपासून मनात होते. सगळे योग जुळून येत हा चित्रपट साकारल्याचे, दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी सांगतात. या निर्मितीदरम्यान जॉनचा सहभागही तितकाच महत्त्वपूर्ण ठरल्याचा त्या आवर्जून सांगतात. ‘एका उत्तम संहितेवर बेतलेल्या या चित्रपटाचा भाग होण्याची संधी मला मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो’, अशी भावना अभिनेता सुबोध भावे यांनी व्यक्त केली तर ‘सविता दामोदर परांजपे’ ही रीमाताईंनी अजरामर केलेली भूमिका मला साकारायला मिळाल्याने एकाचवेळी आनंद आणि जबाबदारी अशी दुहेरी भावना माझ्या मनामध्ये आहे; असे प्रतिपादन अभिनेत्री तृप्ती तोरडमल यांनी केले. ‘माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी व आव्हानात्मक भूमिका मी या चित्रपटामध्ये साकारल्याचे अभिनेता राकेश बापट यांनी सांगितले.

अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांची निर्मिती व वितरण करणारे ‘पॅनोरमा स्टुडिओज’चे कुमार मंगत पाठक यांनी जॉन अब्राहम यांच्या कंपनीसोबत काम करायला मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना चांगल्या निर्मिती मूल्यांमुळे मराठी चित्रपटांचाही निर्मिती व वितरणाचा कॅनव्हास मोठा होईल, असा विश्वास व्यक्त केला.

‘जे.ए.एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून स्वप्ना वाघमारे जोशी या दिग्दर्शिका आहेत. सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. चित्रपटाची कथा शेखर ताम्हाणे यांची असून लेखन व संवाद शिरीष लाटकर यांचे आहेत. योगेंद्र मोगरे, तृप्ती मधुकर तोरडमल सहनिर्माते आहेत. मंदार चोळकर व वैभव जोशी लिखित गीतांना निलेश मोहरीर आणि अमित राज यांचं सुश्राव्य संगीत लाभले आहे. छायांकन प्रसाद भेंडे तर संकलन क्षितिजा खंडागळे यांचे आहे. कलादिग्दर्शन संतोष फुटाणे, ध्वनी संयोजन प्रणाम पानसरे यांचे आहे. वेशभूषा मालविका बजाज यांनी तर मेकअप विनोद सरोदे यांनी केला आहे.येत्या ३१ ऑगस्टला ‘सविता दामोदर परांजपे’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


 

Web Title: The first glimpse of the movie 'Savita Damodar Paranjape'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.