पहिलं लग्न दुबईत, सोनाली कुलकर्णी या देशात दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ, रंगणार हळदी-मेहंदीचा कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 18:36 IST2022-04-29T18:35:56+5:302022-04-29T18:36:16+5:30
Sonalee Kulkarni: गेल्या वर्षी ७ मे रोजी सोनाली कुलकर्णीने कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत लग्न केले होते.

पहिलं लग्न दुबईत, सोनाली कुलकर्णी या देशात दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ, रंगणार हळदी-मेहंदीचा कार्यक्रम
मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) बऱ्याचदा तिच्या आगामी प्रोजेक्टशिवाय खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तेही लग्नामुळे. सोनाली कुलकर्णी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार आहे आणि तेही कुणाल बेनोडेकरसोबत. सोनालीने गेल्या वर्षी म्हणजेच ७ मे रोजी कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत लग्न केले होते. दुबईतील एका मंदिरात लग्न केलं होतं आणि त्यांच्या लग्नाला घरातल्या मंडळींनी ऑनलाइन हजेरी लावली होती. मात्र लग्नाला एक वर्ष पूर्ण होत नाहीत तोवरच त्यांनी पुन्हा एकदा लग्न करण्याचा घाट घातला आहे.
येत्या ७ मे २०२२ रोजी सोनाली आणि कुणालच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहे. याचेच औचित्य साधून त्यांनी याच दिवशी लग्न करण्याची तयारी सुरू केली आहे. ७ मे २०२२ रोजी लंडनमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या लग्नाचा थाट देखील तेवढाच मोठा असणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लग्नातली हौस अपूर्ण राहिल्याने तसेच मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना पहिल्या लग्नाला बोलावता न आल्याने त्यांनी हे लग्न मोठ्या थाटात पार पडणार असल्याचे म्हटले आहे. पुण्यातील पिंपरी भागातील रांका ज्वेलर्स या प्रसिद्ध सोन्याच्या दुकानातून सोनालीच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वीच तिच्या लग्नाच्या तयारीसाठी खरेदी केली आहे. त्यामुळे हे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडणार असल्याचे समजते आहे. मराठीतील बरेच दिग्गज कलाकार या लग्नाला हजेरी देखील लावताना दिसणार आहेत.
मागील वर्षी सोनाली आणि कुणाल यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केले होते मात्र ७ मे रोजी त्यांचे पारंपरिक पद्धतीने लग्न होणार आहे. या सोहळ्याचा थाट लंडनमध्ये रंगणार आहे. सोनाली सध्या मुंबईतच वास्तव्यास आहे मात्र काही दिवसातच ती आपल्या कुटुंबासोबत लंडनला रवाना होणार आहे. याच दिवशी मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे विवाहबद्ध होणार आहेत. त्यामुळे या दोन्ही कलाकारांची लगीनघाई कशी सजणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे. दोघांच्या घरी लग्नाची खरेदी झाली असून आता काही दिवसातच हळद आणि मेहेंदिचा सोहळा रंगलेला पाहायला मिळणार आहे.