Flashback 2019 : हे मराठी चित्रपट ठरले सुपरहिट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 05:35 PM2019-12-28T17:35:01+5:302019-12-28T17:36:33+5:30

या वर्षांत मराठीतील अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूपच चांगले कलेक्शन केले.

Flashback 2019: Superhit Marathi films 2019 | Flashback 2019 : हे मराठी चित्रपट ठरले सुपरहिट

Flashback 2019 : हे मराठी चित्रपट ठरले सुपरहिट

googlenewsNext
ठळक मुद्देशाहिस्तेखानावरील हल्ला म्हणजे शिवशाहीतील सर्जिकल स्ट्राइकच.! याच सर्जिकल स्ट्राइकचा थरार दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटातून पाहायला मिळाला.

2019 हे वर्षं मराठी चित्रपटसृष्टीसाठी चांगले ठरले असेच म्हणावे लागेल. या वर्षांत मराठीतील अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूपच चांगले कलेक्शन केले. जाणून घेऊया कोणते आहेत हे चित्रपट...

आनंदी गोपाळ
'आनंदी' आणि 'गोपाळ' यांच्या प्रेरणादायी जीवनसंघर्षावर आधारित आनंदी गोपाळ हा चित्रपट होता. समीर विद्वांस दिग्दर्शित या चित्रपटात ध्येयवेड्या जोडप्याचा जीवनप्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळाला. इतिहासाच्या सोनेरी पानांवरून रुपेरी पडद्यावर झी स्टुडिओज् च्या माध्यमातून उलगडलेल्या या प्रवासावर प्रेक्षकांनी पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली. या चित्रपटात भाग्यश्री मिलिंद आणि ललित प्रभाकर यांच्या मुख्य भूमिका होत्या.

ठाकरे
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा सिनेमा होता. या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारली होती. या चित्रपटाच्या कथेचे आणि या चित्रपटातील नवाजुद्दीनच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत पानसेने केले होते तर खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली होती.

भाई-व्यक्ती की वल्ली
पु.लं.देशपांडे यांचा जीवनप्रवास भाई-व्यक्ती की वल्ली हा या चित्रपटात मांडण्यात आला होता. महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते तर सागर देशमुख, इरावती हर्षे, विजय केंकरे, सचिन खेडेकर, सतीश आळेकर यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला.

हिरकणी 
“सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे आपले बाळ घरी एकटे असेल... भुकेले असेल या विचाराने व्याकूळ झालेली आई हिरकणी गडाची खोल कडा उतरून जाण्याचं धाडस दाखवते”, ही गोष्ट आपण सर्वजण शाळेत शिकलोय. याच गोष्टीवर आधारित असलेल्या हिरकणी या चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकले. प्रसाद ओकने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत होती. 

फत्तेशिकस्त
शाहिस्तेखानावरील हल्ला म्हणजे शिवशाहीतील सर्जिकल स्ट्राइकच.! याच सर्जिकल स्ट्राइकचा थरार दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटातून पाहायला मिळाला. या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे आदींच्या भूमिका होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगले कलेक्शन केले.

टकाटक
टकाटक’ची निर्मिती ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंदरजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रबिंद्र चौबे यांनी केली होती तर दिग्दर्शन मिलिंद कवडेचे होते. या चित्रपटात अभिजीत-प्रणाली आणि प्रथमेश-रितीका या दोन जोड्यांसोबतच भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर आदी कलाकार मुख्य भूमिकेत होते. अ‍ॅडल्ट कॉमेडीवर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.

गर्लफ्रेंड
अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या गर्लफ्रेंड या सिनेमाला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले. उपेंद्र शिधयेने या सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन केलं होतं. उपेंद्र शिधयेचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. 

Web Title: Flashback 2019: Superhit Marathi films 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.