सोशल मीडियावर का ट्रेंड होतंय #fomochallenge, मराठी कलाकारांनी घेतलेले हे चॅलेंज आहे तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 05:38 PM2019-11-04T17:38:47+5:302019-11-04T17:44:06+5:30
FoMo Web Series : #fomochallenge या ट्रेंडने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे नाहीये.
सोशल मीडियावर सध्या #fomochallenge हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळत आहे. या ट्रेंडने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे नाहीये. हे फोमो चॅलेंज काय आहे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल ना...
फोमो- गर्दीतले दर्दी या शुद्ध देसी मराठीच्या वेबसिरिजमुळे मराठी कलाकार एकमेकांना फोमो चॅलेंज देताना दिसत आहेत. फोमो चॅलेंजच्या माध्यमातून कधी मजेशीर तर कधी सामाजिक मुद्द्यांना हात घालणारे विषय हाताळले जात आहेत.
अमेय वाघ, रसिका सुनील, ऋतुजा बागवे, सिद्धार्थ चांदेकर, दिग्दर्शक संजय जाधव यांनी आतापर्यंत हे चॅलेंज घेतले आहे. मराठी इंडस्ट्रीत सध्या याच चॅलेंजची चर्चा आहे असेच म्हणावे लागेल.
पर्ण पेठे, अभिषेक देशमुख, रुचिता जाधव आणि चेतन चिटणीस हे मराठी सिने आणि टीव्ही विश्वातील लोकप्रिय कलाकार फोमो या वेबसिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच सागर कारंडे देखील या वेबसिरिजमध्ये एका खास भूमिकेत दिसणार आहे. फोमो- गर्दीतले दर्दी या विनोदी वेबसिरीजची निर्मिती शुद्ध देसी स्टुडिओजने केली असून सुशांत धारवाडकर आणि चिन्मय कुलकर्णी यांनी या वेबसिरीजचं दिग्दर्शन केलं आहे.
शुद्ध देसी मराठी आता फोमो ही सहा भागांची वेबसिरीज घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आऊट... फोमो ही अत्यंत साधी सरळ सोप्पी गोष्ट आहे. एका लहान गावातून मोठ्या शहरात येणाऱ्या आणि या मोठ्या शहरात सामावून घेण्यासाठी चाललेल्या एका मुलाची आणि मुलीची धडपड ही फोमोची मूळ कल्पना आहे. फोमो हे आधुनिक काळातील एक नाटक आहे ज्यात आपण लहान शहरांतून येणाऱ्यांशी कसे वागतो. मग त्यांचं काय होतं आणि त्यांना या त्रासाला कसं तोंड द्यावं लागतं यावर भाष्य करण्याचा या वेबसिरीजमधून प्रयत्न करण्यात आला आहे. ही वेबसिरिज 5 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.