Ashok Saraf : "चार लोकांनी माझ्या आई बाबांकडे...", अशोक सराफ यांना या गोष्टीची वाटते खूप खंत
By तेजल गावडे | Updated: February 25, 2025 19:52 IST2025-02-25T19:52:17+5:302025-02-25T19:52:50+5:30
Ashok Saraf : अशोक सराफ यांनी नुकतेच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला.

Ashok Saraf : "चार लोकांनी माझ्या आई बाबांकडे...", अशोक सराफ यांना या गोष्टीची वाटते खूप खंत
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी त्यांच्या कारकीर्दीत आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. नायक, खलनायक, विनोदी, चरित्र अशा सर्वच भूमिका त्यांनी उत्तम साकारल्या आहेत. अशोक सराफ यांनी नुकतेच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. तसेच यावेळी त्यांनी त्यांच्या मनातील एक खंतही सांगितली.
अशोक सराफ यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी त्यांच्या आई-बाबांबद्दल बोलताना एक खंतही बोलून दाखवली. ते म्हणाले की, माझे आई बाबा इतके साधे होते ना इतके साधे होते की माझे काम बघितल्यानंतर त्यांनी इतरांप्रमाणे काय रे माझ्या बाळा असं म्हणत माझे कौतुक केले नाही. त्यांचे मूक एक्स्प्रेशन पाहून मला त्यांना माझं काम आवडलं हे कळायचे. त्यांनी कधीच माझं जास्त कौतुक केलं नाही किंवा मला कधी नको काम करु असेही म्हटलं नाही. त्यांचं त्यांनी असं जाहीरपणे कधी त्याचं प्रदर्शन केलंच नाही. माझ्यापुढे नाही केलं तर लोकांच्या पुढ्यात करण्याचा प्रश्नच येत नाही. कुठेही असा बडेजावपणा दाखवला नाही.
ते पुढे म्हणाले की, लोक म्हणायचे हा एल के सराफांचा मुलगा पण ते कधी नाही म्हणायचे. मला एकच खंत वाटते किंवा माझ्या मनात सल आहे की आता ते नाहीयेत ज्या वेळेला पहिल्यांदा माझे वडील नाखुश होते. त्यांना एवढं कौतुक वाटत नव्हतं पण आता मी इथवर पोहचल्यानंतर आता ते बघायला नाहीयेत. हे मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. त्यांच्या डोळ्यात तो माझ्याबद्दलचा आनंद कौतुक पाहायचे राहिले. तसेच चार लोकांनी त्यांच्याकडे बोट दाखवून हे त्यांचे आई वडील आहेत असे म्हणतील, हे पाहायचे राहून गेले. मला या गोष्टीचं खूप मोठं दुःख वाटतं. माझ्या दृष्टीने म्हणजे थोडीशी राहून गेलेली ही गोष्ट आहे.
वर्कफ्रंट
अशोक सराफ सध्या छोट्या पडद्यावर काम करताना दिसत आहेत. ते अशोक मा. मा. या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. शेवटचे ते नवरा माझा नवसाचा २ सिनेमात काम करताना दिसले. या सिनेमात अभिनेता स्वप्निल जोशी मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.