एंटरटेनिंग पॅकेज असलेला '३१ दिवस' येतोय २० जुलैला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 09:55 AM2018-06-28T09:55:18+5:302018-06-28T10:00:27+5:30
मनाने तरुण असलेल्या प्रत्येक प्रेक्षकासाठी '३१ दिवस' हा सिनेमा आणि त्याची गाणी उत्तम पर्वणी ठरणार आहे. येत्या २० जुलै २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
'३१ दिवस'... का?, कशासाठी?, अशा अनेक गोष्टी सिनेमाचं शीर्षक ऐकताच क्षणी मनात येतात. फिल्मफिनिटी प्रॉडक्शनचे बी एस बाबू निर्मित आणि आशिष भेलकर दिग्दर्शित '३१ दिवस' सिनेमा येत्या २० जुलै २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. नुकताच या -सिनेमाच्या संगीत अनावरणाचा सोहळा पार पडला. मनाने तरुण असलेल्या प्रत्येक प्रेक्षकासाठी हा सिनेमा आणि त्याची गाणी उत्तम पर्वणी ठरणार आहे. या सिनेमाचं संगीत चिनार-महेश या प्रसिद्ध जोडीने दिलं आहे. मनाचा ठाव घेणारी तसंच थिरकायला लावणारी गाणी या जोडगोळीने दिली आहेत. अप्रतिम गाण्यांचा नजराणा '३१ दिवस' सिनेमाच्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे. याबाबत चिनार - महेश म्हणतात, सिनेमाची गाणी सुंदर होण्याचं विशेष कारण म्हणजे दिग्दर्शक आशिष भेलकर यांनी दिलेलं सिनेमाच्या कथेचं नेमकं नॅरेशन आणि गाणी करण्याचं स्वातंत्र्य. ही गाणी सहज प्रेक्षकांच्या मनाला भिडतील. सिनेमात एकूण ४ गाणी आहेत त्यातील ३ गाणी प्रेक्षकांसमोर लवकरच येतील आणि एक गाणं सिनेमाचा टर्निग पॉईंट असल्याने मोठ्या पडद्यावरच पाहणं योग्य राहील. आवर्जून सांगायचं म्हणजे, या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एक मोटिव्हेशनल सॉंग कारण्याचा योग आला. अचानक आलेल्या अडचणींवर मात करण्याची चेतना देणारं गाणं आम्ही करतोय याचाही आनंद होता. गायक हर्षवर्धन वावरे याने सुमधुर आवाजात 'रंग वेगळा' हे गाणं गायलं आहे. सर्व गाण्यांचे गीतकार मंगेश कांगणे यांनी अतिशय सरळ सोप्या पद्धतीने लिहिलेले शब्द गाण्यात बांधताना आम्ही देखील वेगळा अनुभव घेतला. गायिका वैशाली म्हाडे हिने गायलेलं 'काय काय सांगू तुला ग बाय'..., हे थिरकायला लावणारं आजकालच्या हाय फाय लगीनसराई बद्दलचं हळदीचं भन्नाट गाणं चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरेल आणि आम्हला खात्री आहे त्याला देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळेल. बाहुबली सिनेमात दाखवलेल्या केरळातील अथिरापल्ली धबधब्यावर पहिल्यांदाच मराठी चित्रपटातील चित्रित झालेलं 'मनं का असे'..., हे गाणं तितकंच श्रवणीय आणि केरळातील अल्लेपी बॅकवॉटर्स च्या बॅकड्रॉप वर अतिशय नयन रम्य झाले आहे. गायक हृषिकेश रानडे आणि कीर्ती किल्लेदार यांच्या सुमधुर आवाजाने या गाण्याला चारचाँद लावले आहेत.
या सिनेमाची कथा मकरंद आणि त्याच्या कला क्षेत्राशी निगडित असलेल्या स्वप्नाविषयी आहे. जिद्दीने आपल्या इच्छांचा स्वप्नांचा पाठलाग करताना कितीही मोठ्या अडचणी आल्या तरीही न कोलमडता निर्धाराने पुढे जाणारा हा तरुण आजच्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करतोय असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. त्याचबरोबर पदार्पणात पहिला सिनेमा करताना तो एंटरटेनिंग असण्यासोबत मोटिव्हेशनल देखील असावा अशी धारणा दिग्दर्शक आशिष भेलकर यांची आहे. बॉलिवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक मधुर भंडारकर, प्रभुदेवा आणि रेमो डिसुझा यांच्या सिनेमांचे सहदिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरु करून आता मराठीत दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. प्रेक्षकांना कुठेही गृहीत न धरता अप्रतिम निर्मिती मूल्य असलेल्या सिनेमाची निर्मिती बी.एस. बाबू यांनी केली आहे. '३१ दिवस' सिनेमात अभिनेता शशांक केतकर, मयुरी देशमुख, रीना अगरवाल प्रमुख भूमिकेत असून विवेक लागू, सुहिता थत्ते, आशा शेलार, अरुण भडसावळे आणि नितीन जाधव यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
सिनेमाची कथा उमेश जंगम, छायांकन अनिकेत खंडागळे, संकलन देवेंद्र मुरुडेश्वर, नृत्य दिग्दर्शक वृषाली चव्हाण, स्टंट डिरेक्शन रोहित शेट्टी फेम सुनील रॉड्रिक्स यांनी केलं आहे. या सिनेमाची गाणी व्हिडीओ पॅलेसचे नानूभाई यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी संभाळली आहे. यापूर्वी मराठीत कधीही न पाहिलेले लोकेशन्स आणि सेट '३१ दिवस' सिनेमात असल्याने तो पाहण्यासाठी एक दिवस काढावा अशी प्रेक्षकांची नक्कीच इच्छा होईल. येत्या २० जुलै २०१८ रोजी हा सिनेमा महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.