"गेल्या २० वर्षांपासून ते एकटेच राहायचे", वडिलांबाबत गश्मीरचा खुलासा, म्हणाला, "आमच्यात तणाव होता, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 03:28 PM2023-08-24T15:28:28+5:302023-08-24T15:33:36+5:30
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय आणि मुलगा अभिनेता गश्मीर महाजनीला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. वडिलांच्या निधनानंतर गश्मीरने पहिल्यांदाच याबाबत उघडपणे भाष्य केलं आहे. गश्मीरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत.
मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांचं १५ जुलैला निधन झालं. तळोजा येथील फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला होता. दोन दिवस त्यांचा मृतदेह बंद खोलीत होता. रवींद्र महाजनी कुटुंबीयांपासून वेगळे एकटेच राहत होते. त्यांच्या निधनानंतर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. महाजनींचं कुटुंबीय आणि त्यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनीला ट्रोलही करण्यात आलं होतं. वडिलांच्या निधनानंतर गश्मीरने पहिल्यांदाच याबाबत उघडपणे भाष्य केलं आहे. गश्मीरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत.
'ईटाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत गश्मीर म्हणाला, “वडिलांच्या निधनानंतर माझ्या कुटुंबावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. मी किती बेजबाबदार मुलगा आहे, असं म्हणत दोन दिवस वडिलांच्या निधनाबद्दल कसं कळलं नाही, असंदेखील विचारलं गेलं. त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो, खोलीत बसून सोशल मीडियावर असे प्रश्न विचारणं खूप सोपं आहे. पण, त्या परिस्थितीच्या दोन्ही बाजू समजून घेऊन भावनिकरित्या त्याचा विचार करणं अवघड आहे. प्रत्येक व्यक्तीच्या दोन बाजू असतात. सगळे जण परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करतात. पण, ते कोणालाच शक्य होत नाही. मी ही परिपूर्ण नाही...माझे वडिलही नव्हते.”
“स्वत: लक्झरियस आयुष्य जगत असून त्यांना छोट्या खोलीत टाकलं होतं, असंही म्हटलं गेलं. पण, त्यांनी स्वत: स्वतंत्र आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या २० वर्षांपासून ते एकटेच राहत होते. एक कुटुंब म्हणून आम्ही त्यांचा हा निर्णय स्वीकारण्यापलीकडे काहीच करू शकलो नाही. कारण, एखाद्या व्यक्तीवर त्याच्या मनाविरुद्ध गोष्टी करायला तुम्ही भाग पाडू शकत नाही. कधी कधी ते आमच्याबरोबर येऊनही राहायचे. जेव्हा त्यांना स्वतंत्र आयुष्य जगायचं असायचं, तेव्हा ते निघून जायचे. जेव्हा माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हा ते आमच्याबरोबर खूप काळ राहिले होते. ते फार मूडी होते. त्यांना स्वतंत्र आयुष्य जगायला आवडायचं. कोणीही त्यांची कामे केलेली त्यांना आवडायची नाहीत. ते स्वत:च त्यांचं जेवण बनवायचे. घराची स्वच्छताही ते स्वत:च करायचे. त्यामुळे घरकाम करणाऱ्या व्यक्तीला पाठवलं तरी दोन दिवसांनी ते त्यांना कामावरुन काढून टाकायचे,” असंही त्याने सांगितलं
पुढे गश्मीर म्हणाला, “गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि मित्रांपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली होती. शेजाऱ्यांशी संपर्क ठेवणारे, मॉर्निंग वॉकच्या ग्रुपमध्ये सहभागी होणारे असे ते व्यक्ती नव्हते. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूबद्दलही आम्हाला लवकर कळलं नाही. माझ्या या बोलण्याचे अनेक अर्थ या क्षणाला लावले जाऊ शकतात. पण, आता मला त्याने फरक पडत नाही. काही कारणांमुळे आमच्या नात्यात तणाव आला होता. पण, ते माझे वडील होते. माझ्या आईचे पती होते. यामागे खूप गोष्टी आहेत. पण, काही कौटुंबिक गोष्टी सार्वजनिकरित्या सगळ्यांसमोर शेअर करता येत नाहीत. मराठी कलाविश्वातील ते सगळ्यात हँडसम अभिनेता होते. हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.”