"रवींद्र महाजनींच्या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारणार का?", गश्मीर म्हणाला - जर मी...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 11:13 AM2024-02-05T11:13:29+5:302024-02-05T11:14:19+5:30
नुकतंच गश्मीरने askgashmeer हे सेशन घेतलं होतं. यामध्ये त्याला एका चाहत्याने गश्मीरचे वडील रवींद्र महाजनी यांच्याबद्दल प्रश्न विचारला.
मराठी सिनेसृष्टीतील हँडसम हंक अशी ओळख मिळवलेला अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. अभिनयाबरोबरच गश्मीर त्याच्या फिटनेसमुळेही चर्चेत असतो. गश्मीरने मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही जम बसवला. त्याने मराठीबरोबरच अनेक हिंदी मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. गश्मीरचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून तो सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. नवीन प्रोजेक्टबरोबरच गश्मीर वैयक्तिक आयुष्यातील अनेक अपडेट्सही चाहत्यांना देत असतो.
अनेकदा गश्मीर इन्स्टाग्रामवर askgashmeer सेशनही घेताना दिसतो. या सेशनमध्ये गश्मीर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतो. नुकतंच गश्मीरने हे सेशन घेतलं होतं. यामध्ये त्याला एका चाहत्याने गश्मीरचे वडील रवींद्र महाजनी यांच्याबद्दल प्रश्न विचारला. "वडील रवींद्र महाजनींवर बायोपिक आला तर त्यात तुम्ही त्यांची भूमिका साकारणार का?" असा प्रश्न चाहत्याला गश्मीरने विचारला होता. चाहत्याच्या या प्रश्नाचं गश्मीरने उत्तर दिलं.
"जर मी त्या सिनेमाची निर्मिती करत असेन तर...सर्वकाही योग्य पद्धतीने दाखवलं जाईल याची खात्री घेईन", असं उत्तर गश्मीरने दिलं. गश्मीरचे वडील रवींद्र महाजनी हे दिग्गज अभिनेते होते. त्यांनी अभिनयाने एक काळ गाजवला होता. १४ जुलै २०२३ रोजी त्यांचं निधन झालं.
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत गश्मीरनेही सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. अभिनयाबरोबरच गश्मीर उत्तम डान्सरही आहे. 'धर्मवीर', 'कान्हा', 'प्रेमा तुझा रंग कसा', 'देऊळ बंद' या मराठी सिनेमांत गश्मीर झळकला. तर 'पानिपत', 'डोंगरी का राजा' या बॉलिवूड सिनेमांमध्येही त्याने काम केलं आहे.