रवींद्र महाजनींच्या निधनानंतर पहिल्यांदाच बोलला गश्मीर; म्हणाला- 'योग्य वेळ आली की...'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 10:35 AM2023-07-19T10:35:38+5:302023-07-19T10:36:09+5:30
Ravindra Mahajani and Gashmeer Mahajani : मराठी सिनेसृष्टीतील हॅण्डसम हंक अभिनेते रवींद्र महाजनी यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर आता गश्मीर महाजनीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
मराठी सिनेसृष्टीतील हॅण्डसम हंक अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. तळेगाव दाभाडेजवळील आंबी गावात ते भाड्याने राहत होते आणि त्याच फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा, असे पोलिसांनी म्हटले. ८ महिन्यांपासून ते एकटेच राहत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी गश्मीर आणि त्याच्या कुटुंबांवर निशाणा साधायला सुरुवात केली. एवढे मोठे अभिनेते असूनही ते कुटुंबासोबत का राहत नव्हते? त्यांना २ दिवस कुणीही फोन का केला नाही? अशा अनेक प्रतिक्रिया त्यावर आल्या. तसेच अनेकांनी गश्मीरला ट्रोल करत त्याला नको नको ते ऐकवले. दरम्यान आता गश्मीर(Gashmeer Mahajani)ने इंस्टाग्राम स्टोरीवर प्रतिक्रिया दिली आहे.
गश्मीर महाजनी याने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, एका कलाकाराला कलाप्रमाणे राहू द्या. मी आणि माझे सहकारी शांत राहू. जरी आम्ही शांत राहून मला / आम्हाला द्वेष आणि शिव्या देत असाल तरी आम्ही कोणत्याही गोष्टीपेक्षा त्याचे स्वागत करतो. देव दिवंगत आत्म्यास शांती देवो. ओम शांती. ते माझे वडील आणि माझ्या आईचे पती होते आणि आम्ही त्यांना तुमच्यापैकी कोणापेक्षाही चांगले ओळखतो. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा मी याबद्दल सांगेन.
गश्मीर महाजनी त्याच्या आई, पत्नी आणि मुलासोबत मुंबईत राहत होता आणि रवींद्र महाजनी एकटे तळेगावमधील आंबी गावात भाड्याच्या घरात राहत होते. त्यांचे निधन २-३ दिवसांपूर्वी झाले, हे घरातल्यांनाही माहित नव्हते. यावरुन लोकांनी अभिनेत्याला आणि त्याच्या कुटुंबियांना खूप ट्रोल केले. सोशल मीडियावर वडिलांसोबत एकही फोटो नसल्यामुळे त्यावरुनही त्याला ट्रोल केले जात आहे. त्याच्या लेटेस्ट फोटोंवर कमेंट करत अनेकांनी रविंद्र यांच्याबाबत सवाल केले.