पाटील आडनावावरुन गौतमीला इशारा, प्रतिक्रिया देत गौतमी म्हणाली, ' माझं आडनाव..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 10:21 AM2023-05-26T10:21:54+5:302023-05-26T10:23:21+5:30
गौतमीचा काल विरार येथील खार्डी गावात कार्यक्रम पार पडला.
'सबसे कातील गौतमी पाटील' अशीच चर्चा सध्या गावागावात ऐकायला मिळतेय. सोबतच गौतमी पाटील (Gautami Patil) आणि वाद हे देखील समीकरणच झालंय. रोज गौतमीबाबतीत काही ना काही नवीन घडामोडी घडत आहेत. आता काय तर गौतमीचं आडनाव पाटील नव्हे तर चाबुकस्वार आहे हे समोर आलंय. तसंच ती पाटलांची बदनामी करतेय तिने आडनाव बदलावं असा इशारा मराठा संघटनांनी दिला आहे. यावर आता गौतमीची प्रतिक्रिया आली आहे.
गौतमीचा काल विरार येथील खार्डी गावात कार्यक्रम पार पडला. सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त तिच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.कार्यक्रमासाठी दाखल होताच गौतमीला माध्यमांनी गराडा घातला. यावेळी तिला राजकारणात येणार का आणि आडनाव बदलणार का असे प्रश्न विचारण्यात आले. यावर तिने प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, " मी पाटील आहे तर पाटील वापरणारच ना. माझ्याबद्दल कोणीही काय बोलले तरी मला फरक पडत नाही. माझे कार्यक्रम चांगले पार पडत आहेत आजचाही कार्यक्रम चांगलाच पार पडेल."
ती पुढे म्हणाली, "ज्याला माझ्या कार्यक्रमाबद्दल प्रश्न असतील तर त्याने माझा कार्यक्रम येऊन पूर्ण पाहावा आणि मग बोलावं की काय चाललंय. मी राजकारणात येणार नाही माझा तसा काहीही प्लॅन नाही. मी माझे कार्यक्रम करतीए ते करत राहणार."
गौतमीला मराठी संघटनांचा इशारा
"गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीनं पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही,” असा इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जराड पाटील यांनी दिला आहे.