गीतांजली कुलकर्णीचा लंडन, न्यूयॉर्कमध्ये बोलबाला! 'मिनिमम' आणि 'ऱ्हायनो चार्ज' झळकणार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 06:36 PM2024-05-02T18:36:25+5:302024-05-02T18:36:51+5:30

Geetanjali Kulkarni : उत्तम अभिनय आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाकरता ओळखल्या जाणाऱ्या गीतांजली कुलकर्णीचे 'मिनिमम' आणि 'ऱ्हायनो चार्ज' या दोन चित्रपटांचा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रीमियर होणार आहे.

Geetanjali Kulkarni dominates in London, New York! 'Minimum' and 'Rhino Charge' will be screened at the International Film Festival | गीतांजली कुलकर्णीचा लंडन, न्यूयॉर्कमध्ये बोलबाला! 'मिनिमम' आणि 'ऱ्हायनो चार्ज' झळकणार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात

गीतांजली कुलकर्णीचा लंडन, न्यूयॉर्कमध्ये बोलबाला! 'मिनिमम' आणि 'ऱ्हायनो चार्ज' झळकणार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात

उत्तम अभिनय आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाकरता ओळखल्या जाणाऱ्या गीतांजली कुलकर्णी(Geetanjali Kulkarni)चे 'मिनिमम' आणि 'ऱ्हायनो चार्ज' या दोन चित्रपटांचा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रीमियर होणार आहे. यूके आशियाई चित्रपट महोत्सवात मिनिमम झळकत असून, न्यूयॉर्क इंडिया फिल्म फेस्टिव्हलद्वारे ऱ्हायनो चार्ज हा लघुपट जगभरातील रसिकांसमोर येत आहे. 

गीतांजली कुलकर्णीच्या गौरवशाली कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा टप्पा असून, ‘मिनिमम’ आपल्या मार्मिक कथेद्वारे आणि त्यात असलेल्या महत्त्वाच्या कलाकारांच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांना नक्कीच भुरळ घालेल. प्लॅटून फिल्म्स आणि एलानार फिल्म्स निर्मित, प्रतिभावंत रुमाना मुल्ला यांनी दिग्दर्शित केलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचे कथानक परदेशातील आव्हाने आणि व्यामिश्रतेतून वाट काढणाऱ्या स्थलांतरितांच्या जगण्याभोवती फिरते. गीतांजली कुलकर्णीसोबत, या चित्रपटात नमित दास, सबा आझाद आणि स्वत: रुमाना मुल्ला यांचा अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळेल. २ मे रोजी यूके एशियन फिल्म फेस्टिव्हलद्वारे या चित्रपटाचा प्रीमियर होत असून जगभरातील प्रेक्षकांवर छाप  उमटवण्याकरता ‘मिनिमम’ सज्ज झाला आहे.

अभिरूप बसू दिग्दर्शित ‘ऱ्हायनो चार्ज’ या लघुपटातही, गीतांजली कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अल्पसंख्याक समुदायाच्या पार्श्वभूमीवरील या लघुपटात एका अनिश्चित परिस्थितीत अडकलेल्या केअरटेकर व्यक्तीची चित्तवेधक कथा मांडली आहे. विनोद नागपाल यांनीही या लघुपटात उत्तम कामगिरी बजावली असून, जून महिन्यात आयोजित न्यूयॉर्क इंडिया फिल्म फेस्टिव्हलमध्ये या लघुपटाचा प्रीमियर होणार आहे. 

गीतांजलीने वेगळ्या धाटणीचे चित्रपट करण्यासंदर्भात उत्साह व्यक्त केला. ती म्हणाली, “मला नेहमीच वाटते की, वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवणे महत्त्वाचे असते आणि ‘मिनिमम’ व ‘ऱ्हायनो चार्ज’ अशा दोन चित्रपटांत अभिनय करता आला, याचा मला अतिशय आनंद वाटतो. ‘मिनिमम’ ही परदेशी जगतात स्थलांतरित झालेल्यांची कथा असून, त्यांच्यासमोरची आव्हाने, नातेसंबंधांची गुंतागुंत या चित्रपटात रेखाटण्यात आली आहेत. ‘ऱ्हायनो चार्ज’ या लघुपटात अल्पसंख्याक समुदायातील एक केअरटेकर व्यक्ती अनिश्चित परिस्थितीत सापडते, त्या कथेचे चित्रण करण्यात आले आहे.”

गीतांजली कुलकर्णीने 'कोर्ट', 'मुक्तिभवन' आणि 'कारखानीसांची वारी' यांसारख्या समीक्षकांनी गौरवलेल्या प्रशंसनीय चित्रपटात काम केले आहे. याशिवाय 'गुल्लक', 'ताजमहल १९८९' आणि 'अपॉझ्ड - नया सफर' यांसारख्या लोकप्रिय वेब सीरिजमध्येही ती झळकली आहे.
 

Web Title: Geetanjali Kulkarni dominates in London, New York! 'Minimum' and 'Rhino Charge' will be screened at the International Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.