मनामनात घर करणारा ‘घर होतं मेणाचं’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 01:02 PM2018-12-15T13:02:40+5:302018-12-15T13:08:09+5:30
गतिमंद मुलाची भूमिका करताना संवाद नसताना केवळ भावनिक हावभाव चेह-यावर दाखवताना सिद्धार्थ जाधवचा अप्रतिम अभिनय न कळतच अनेक प्रसंगात प्रेक्षकांच्या डोळयांच्या कडा ओलावून जातो
काही चित्रपट मनांत कायमचं घर करून जातात. ‘घर होतं मेणाचं’ हा चित्रपट यापैकीच एक असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘लार्जन दॅन लाईफ’ चित्रपट करण्यापेक्षा एक साधी, सोपी, ह्दयस्पर्शा गोष्ट तितक्याच प्रभावी पडद्यावर घडत जाते. मराठी चित्रपटांत ख-या अर्थाने चित्रकथा या संकल्पनेचा वापर करून या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवादलेखक राजेश द. चव्हाण यांनी निश्चितच वेगळा परंतु धाडसी मार्ग स्वीकारला आणि यात ते पूर्ण यशस्वी ठरले आहेत. सुंदर कथा आणि त्या जोडीला भक्कम, बंदिस्त पटकथा यामुळे चित्रपट अगदी पहिल्या दृश्यापासूनच प्रेक्षकांची पकड घेतो. साहित्याची उत्तम जाण असल्यामुळे यातले संवाद टाळयांसोबतच चित्रपटांतील पात्रांच्या मनोवृत्तींचा विचार करायला भाग पाडणारे आहेत. पटकथेमधील गतिमानता यामुळे अगदी शेवटच्या दृश्यापर्यंत चित्रपटावरील पकड कुठेही सुटत नाही. चित्रपटाचा पूर्वार्ध जसा झपकन जातो तसाच उत्तरार्ध प्रत्येक दृश्यागणिक प्रेक्षकांशी भावनिक संवाद साधू लागतो. अभिनेते मोहन जोशी, अलका कुबल-आठल्ये, अविनाश नारकर यांचा अभिनय केवळ लाजवाब. गतिमंद मुलाची भूमिका करताना संवाद नसताना केवळ भावनिक हावभाव चेह-यावर दाखवताना सिद्धार्थ जाधवचा अप्रतिम अभिनय न कळतच अनेक प्रसंगात प्रेक्षकांच्या डोळयांच्या कडा ओलावून जातो. विशेष उल्लेख अभिनेत्री पल्लवी सुभाषचा. एक गुणी, संयत अभिनेत्री म्हणून तिने भूमिका अगदी समरसून केलेली आहे. सोबत आशालता वाबगावकर, शितल शुक्ल, विजय पटवर्धन, रविंद्र बेर्डे अशा सहकलाकारांनी आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे कलाकारांच्या कमाल केमिस्ट्रीला एकापेक्षा एक सरस गाण्यांची जोड. संगीतकार अशोक पत्की या नावातच सारं काही आलं. मनात घोळत राहणारी सुंदर गीते सोबत गीतकार आरती प्रभूंच्या शब्दांतील वेदना व देवकी पंडित, सुरेश वाडकर यांच्या आवाजातील दर्द चित्रपटाच्या प्रसंगांना अधिकच उंचीवर घेऊन जातो.
निर्मितीच्या पदार्पणातच एक वेगळेपणा जपणारे निर्माते म्हणून या चित्रपटाचे निर्माते नितिन ज्ञानदेव शेटे व ज्ञानेश्वर ढोके यांचे विशेष कौतुक करावे लागेल. काही कोटींचे गल्ले जमविण्याच्या नादी न लागता समाजभान राखून आत्मिक समाधान देणा-या चित्रपटाची निर्मिती करण्यात त्यांना खरेखुरे यश आलेले आहे. दिग्दर्शक राजेश द. चव्हाण यांना माध्यमाची सुरेख जाण असल्यामुळे एक भावनिक,उत्कट, वास्तववादी असा सुंदर, देखणा सिनेमा तयार झालेला आहे. राजेश एक संवेदनशील दिग्दर्शकासोबतच एक उत्तम लेखक असल्यामुळे प्रत्येक व्यक्तिरेखेच्या मानसिकतेचा योग्य आढावा इथे घेतलेला दिसतो. त्यामुळेच हा चित्रपट अगदी वास्तववादी होऊन जातो. नेहमीप्रमाणे अनेक सिनेमांच्या गर्दात प्रदर्शित झाल्यामुळे निर्मात्यांना थिएटर मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. श्रीसिद्धि गणेश फिल्म्स निर्मित व श्री ज्ञानदेव शेटे प्रस्तुत ‘घर होतं मेणाचं’ हा चित्रपट आवर्जून पाहावा असा आहे.