‘घर होतं मेणाचं’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 03:34 PM2018-12-05T15:34:49+5:302018-12-05T15:45:47+5:30
बहुविध माणसांच्या जगात, एका अव्यक्त मनाचा वेध घेणारा एक सुंदर कौटुंबिक चित्रपट ‘घर होतं मेणाचं’ लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात दिमाखाने प्रदर्शित होणार आहे.
मराठी चित्रपटाचा ट्रेण्ड बदलू लागलायं का?तर, त्याचं उत्तर आहे, ‘होय’. गेल्या काही वर्षातील चित्रपटांचा मागोवा घेतला, तर मराठी चित्रपटांमध्ये अमूलाग्र बदल घडू लागला आहे. निर्माते मनोरंजनासोबतच सामाजिक भान लक्षात घेऊन आशयघन चित्रपटांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करू लागले आहेत. नितीन ज्ञानदेव शेटे व ज्ञानेश्वर ढोके या निर्मात्यांनी त्यांच्या ‘घर होतं मेणाचं’ या अत्यंत संवेदनशील व अंतर्मुख करणा-या चित्रपटाच्या निर्मितीद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. बहुविध माणसांच्या जगात, एका अव्यक्त मनाचा वेध घेणारा एक सुंदर कौटुंबिक चित्रपट ‘घर होतं मेणाचं’ लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात दिमाखाने प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माते श्री नितीन ज्ञानदेव शेटे व श्री ज्ञानेश्वर ढोके यांनी स्त्रियांना सहानुभूतीपेक्षा समानुभूतीचा सन्मान मिळावा या संकल्पनेतून ‘घर होतं मेणाचं’ यासारख्या संवेदनशील चित्रपटाची निर्मिती केल्यामुळे समाजातील अनेक स्तरांवर त्यांचे अभिनंदन चित्रपट प्रदर्शनापूर्वाच केले जात आहे.
बोथट झालेल्या समाजभावनांना सजग बनविण्याच्या दृष्टीने चित्रपटाचे कथा, पटकथा,संवादलेखक व दिग्दर्शक राजेश द. चव्हाण यांनी अतिशय कल्पकतेने ‘स्त्रीने व्यक्त व्हायला हवं !’ या कथासूत्राभोवती समाजातल्या कितीतरी स्त्रियांचा अनुभव उत्कृष्टपणे आणि नेमकेपणानं चित्रपटात मांडला आहे. सामाजिक आशयासोबतच एका सहजसुंदर कौटुंबिक चित्रकथेची अचूक मांडणी राजेशच्या दिग्दर्शकीय कौशल्यामुळे अतिशय हळवेपणानं कलात्मकतेने हाताळली गेली आहे.
‘घर होतं मेणाचं’सारखा धाडसी विषय प्रस्तुतकर्ते श्री. ज्ञानदेव राजाराम शेटे यांनी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर यशस्वीपणे मांडण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. मोहन जोशी, अलका कुबल,पल्लवी सुभाष, सिद्धार्थ जाधव, अविनाश नारकर सारखी तगडी कलाकारांची फौज त्यांच्या जोडीला अशोक पत्की यांसारख्या मेलडी किंग यांचा स्वरसाज त्यामुळे अनेक वर्षांनंतर जुळून आलेली एक सुरेख काव्यात्मक मैफल रसिकांना नक्कीच अनुभवता येईल. समाजात कितीतरी वसुंधरा असतील, ज्यांनी ‘व्यक्त व्हायला हवं !’ हा ठाम संदेश देत ‘घर होतं मेणाचं’ हा सर्वांगसुंदर चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.