'गर्ल्स' सिनेमा प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोव-यात, पोस्टर पाहून सलील कुलकर्णी यांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 01:00 PM2019-10-10T13:00:01+5:302019-10-10T13:01:04+5:30
गर्ल्स सिनेमाच्या पोस्टवर हाऊसफुल्ल गर्दीत चालू असलेल्या कार्यक्रमाच्या नावाचा अशाप्रकारे वापर करणे हा अपमान असल्याचे सलील कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'गर्ल्स' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. मात्र हे पोस्टर पाहून संगीतकार सलील कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण पोस्टरवर ''आयुष्यावर बोलु काही'' अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सलील कुलकर्णी यांचा स्टेज शो याच नावाने गेली सोळा वर्ष रसिकांचे अविरत मनोरंजन करतो आहे. नावामुळेच हा शो पाहण्यासाठी हजारो रसिक येतात. तसेच नाती .. आई - बाबा..घर ..ह्या हळव्या विषयांना हात घालणारा आमचा आणि तुमचा लाडका कार्यक्रम मराठी कविता आणि गाण्यांनी अनेक भावना दडलेल्या या शोच्या नावाची अशा रितीने विडंबना करणे योग्य नसल्यामुळे त्यांनी यावर निषेध जाहीर केला आहे.
सिनेमाच्या पोस्टवर हाऊसफुल्ल गर्दीत चालू असलेल्या कार्यक्रमाच्या नावाचा अशाप्रकारे वापर करणे हा अपमान असल्याचे सलील कुलकर्णी यांनी म्हटले आहे. 'गर्ल्स' ह्या अभिजात चित्रपटातील ही सुसंस्कृत व्यक्ती FamilySucks And आयुष्यावर बोलू काही " असं लिहिलेला T-shirt घालून असभ्य हालचाली करते हे अजिबात योग्य नसल्याचेही सलील यांनी म्हटले आहे.
सलील कुलर्णी यांनी नाराजी व्यक्त करताच अनेक चाहत्यांनीही यावर टीका केली आहे. "आयुष्यावर बोलू काही " या शोच्या नावाचा अशा प्रकारे वापर करणे हे योग्य नसल्याचेही सोशल मीडियावर प्रतिक्रीया उमटत आहेत. यावर दिग्दर्शक विशाल देवरुखकरने स्पष्टीकरण दिले नसले तरी, त्याची भूमिका काय असणार हे याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे.