'कोरोना काळात पाहायला मिळाले चांगले-वाईट दिवस'; अभिनेता जितेंद्र जोशीने व्यक्त केल्या भावना
By तेजल गावडे | Published: August 18, 2021 01:58 PM2021-08-18T13:58:57+5:302021-08-18T13:59:40+5:30
अभिनेता जितेंद्र जोशी 'कार्टेल' या हिंदी वेबसीरिजमध्ये एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशीने चित्रपट, छोटा पडदा आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. आता तो कार्टेल या हिंदी वेबसीरिजमध्ये एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. यात त्याने मधुकर म्हात्रे उर्फ मधुभाईची भूमिका साकारली आहे. या वेबसीरिजच्या निमित्ताने त्याच्याशी केलेली ही बातचीत...
- तेजल गावडे
'कार्टेल' वेबसीरिज आणि यातील तुझ्या भूमिकेबद्दल सांग?
- 'कार्टेल' वेबसीरिजमध्ये मुंबईतील वेगवेगळ्या प्रकारचे गॅंग्स दाखवले आहेत, त्यातील एक गँग आहे आंग्रे गॅंग. आँग्रे गँगमध्ये राणी माई आहे आणि तिला अभय नामक एक मुलगा आहे. तसेच तिच्या बहिणीच्या मृत्यूनंतर तिची दोन मुले मेजर आणि मधूकरचा सांभाळदेखील या राणी माईने केला आहे. ती काळा बाजार सांभाळते. या तीन भावंडांपैकी मधूकर हा अस्सल मराठमोळा. स्वतःच्या कामाला प्राधान्य देणारा आहे. एकीकडे तो अतिशय आक्राळ विक्राळ रुप धारण करणारा आहे तर दुसरीकडे माई आणि बायकोपुढे मवाळ आहे. एकीकडे खुंशी, मारामारी करणारा असला तरी तो कुटुंबवत्सल आहे. एकीकडे तो गुंडांना एकटा मारू शकतो तर दुसरीकडे तो अत्यंत मृदू मनाचा बाप आणि नवरादेखील आहे. हे निराळेच कॅरेक्टर आहे. ही निगेटिव्ह भूमिका नाही. अत्यंत सकारात्मक व्यक्ती आहे.
या वेबसीरिजचा अनुभव कसा होता?
- एखादी भूमिका आवडली की मी काम करतो. काम करताना दिग्दर्शकाला ज्या गोष्टी अपेक्षित आहे, त्यावर काम करण्याचा माझा प्रयत्न असतो. काम करताना काही जणांसोबत मैत्री होते. तशीच या सीरिजमध्ये काम करताना माझे काही कलाकारांसोबत चांगले बॉण्डिंग झाले. खरेतर ही वेबसीरिज ९ महिन्यात पूर्ण होणार होती. मात्र ही सीरिज बनण्यासाठी अडीच वर्षे लागली. लॉकडाउनमध्ये जवळपास दीड वर्षे गेले. लॉकडाउनमध्ये कामही बंद होते. त्यामुळे तयार होऊन सादर व्हायला एवढा वेळ लागला. नाहीतर २०२०लाच ही सीरिज प्रदर्शित झाली असती. मात्र आता ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.
तू वेगवेगळ्या भूमिका इतक्या सहजतेने कसा साकारतोस?
- वेगवेगळ्या भूमिका करण्याचा माझा हट्ट आहे. त्यामुळे मी भूमिकेचा विचार करतो आणि त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करतो. स्वतःकडे वेगळ्या दृष्टीने पाहावे लागते. अभ्यास करावा लागतो. वेगळी बोलण्याची शैली करावी लागते. हा एक प्रयत्न आहे. एकाच प्रकारच्या भूमिका करायचे नाहीत, हा माझा निर्णय आहे. त्यामुळे त्यासाठी माझी कठोर परिश्रम करण्याची तयारी असते आणि ते माझे काम आहे. ते करायला पाहिजे. फक्त वेगळा वेश करून कसे चालेल त्यासाठी त्याची देहबोली, भाषा अशा सर्व गोष्टींवर बारकाईने काम करावे लागते.
गोदावरी चित्रपटातून तू निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहेस, तर याबद्दल काय सांगशील?
- नाटकाची निर्मिती मी केली होती. चित्रपट निर्मितीसाठी खूप पैसे लागतात. पण गोदावरीचा सुरूवातीला निर्माता होता. पण कोरोनाच्या परिस्थितीत नंतर निर्मात्याने काढता पाय घेतला. त्यानंतर चित्रपट करायचा की नाही हा प्रश्न पडला होता. मग म्हटले करूयात. माझ्याकडे जे काही पैसे होते ते टाकले. आणखी काही लोकांनी पैसे दिले आणि आम्ही हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. गोदावरी चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादानुसार आणखी चित्रपट निर्मिती करण्याबाबतचा विचार करेन.
लॉकडाउनमध्ये तू कुटुंबासोबत कसा वेळ व्यतित केलास?
- लॉकडाउनमध्ये कुठे जात येत नव्हते. त्यामुळे मला लॉकडाउनमधील जे काही ९-१० महिन्याचा कालावधी होता तो संपूर्णपणे कुटुंबासोबत व्यतित करायला मिळाला. त्या दरम्यान विविध गोष्टी शिकता आल्या. मुलीसोबत फार सुंदर काळ घालवता आला. त्या काळाचा फार आनंद घेतला. स्वतः विषयी, स्वतःच्या वैयक्तिक जीवनाविषयी, स्वभावाविषयी माणूस म्हणून शोधता आल्या. अत्यंत सुंदर स्वयंपाकही बनवता आल्या. या निमित्ताने बऱ्याच गोष्टींसाठी सवड मिळाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझ्या कुटुंबावर संकट तर येणार नाही ना, काम मिळेल का, पुढचा खर्च कसा करायचा या गोष्टींमुळे मी देखील इतरांप्रमाणे विवंचनेत होतो. कोरोनामुळे माझ्या आजी(आईची आई)चे निधन झाले. या काळात चांगले वाईट दिवस पाहायला मिळाले. या काळात लोकांना जे भोगावे लागत होते ते पाहून त्रास होत होता.
तुझ्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांग?
- एका हिंदी चित्रपटात मी काम करताना दिसणार आहे. त्यात अर्शद वारसी आणि जुही चावला मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. चांगला दिग्दर्शक आणि चांगल्या कलाकारांसोबत आणखी एका वेबसीरिजमध्ये मी काम करतो आहे. याशिवायही एका चित्रपटाची तयारीदेखील सुरू आहे.