चांगल्या नाटकांना 'बंद'ची घरघर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:11 AM2016-01-16T01:11:21+5:302016-02-05T07:16:27+5:30

कलाकारांमधील मतभेदांमुळे 'समुद्र' हे नाटक बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. कारण कुणालाही मानसिक त्रास होऊन उगाच प्रयोग रेटण्यात अर्थ ...

Good play 'Closer' home | चांगल्या नाटकांना 'बंद'ची घरघर

चांगल्या नाटकांना 'बंद'ची घरघर

googlenewsNext
ाकारांमधील मतभेदांमुळे 'समुद्र' हे नाटक बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. कारण कुणालाही मानसिक त्रास होऊन उगाच प्रयोग रेटण्यात अर्थ नव्हता. त्यामुळे नाटकाला व्यावसायिक यश मिळूनही हे नाटक थांबवावं लागलं.
- प्रसाद कांबळी, निर्माता, भद्रकाली नाटक दोन कारणांमुळे बंद पडते एक तर सरकार त्यावर आक्षेप घेते किंवा प्रेक्षक ते बंद पाडतात. घाशीराम कोतवाल किंवा सखाराम बाईंडरसारखी नाटके बंद करण्यात आली, पण निर्मात्यांनी कोर्टात धाव घेतल्यामुळे ती पुन्हा सुरू झाली. त्यानंतर आक्षेप नाही घेतला गेला. मुळात नाटक बंद करायचे असेल तर नाट्य परीक्षण मंडळाकडे एक प्रत द्यावी लागते. त्याशिवाय नाटक बंद करता येत नाही. परीक्षण मंडळाने नाटक मान्य केले असेल तर नाटकाचा प्रयोग करायलाच हवा. लेखन आणि अभिनयाचा समतोल बाळगणं हे कलाकारांचं कर्तव्य असतं.
- डॉ. वि. भा. देशपांडे, ज्येष्ठ नाट्य समीक्षक 'नाटक' हा कलासंस्कृतीचा अविभाज्य भाग मानला जातो. रंगदेवतेच्या निष्काम सेवेतूनच कलाकारांच्या अभिनय कारकिर्दीचा प्रवास सुरू होतो. एक काळ असा होता, की ज्या वेळी 'संगीत नाटक' हे मनोरंजनाचे महत्त्वपूर्ण माध्यम मानले जात होते. कालपरत्वे रंगभूमीने नवनवीन वळणे घेतली आणि रंगभूमीची क्षितिजं विस्तारत गेली. नाट्यचळवळीने सर्व ठिकाणी आपली पाळंमुळं रोवली आणि प्रायोगिक, व्यावसायिक, समांतर असे नवनवीन आयाम रंगभूमीला मिळाले. मात्र मधल्या टप्प्यात दूरचित्रवाहिन्यांच्या मालिकांमुळे रंगभूमीला काहीशी उतरती कळा लागली.. घरबसल्या मनोरंजन करणार्‍या 'इडियट बॉक्स'मुळे प्रेक्षकांनी रंगभूमीकडे काहीशी पाठ फिरविली.
तरीही रंगभूमीवर सातत्याने नवनवीन प्रयोगाची दालनं उभारली जाऊ लागल्यामुळे रंगभूमीचे निस्सीम भक्त असलेला प्रेक्षकवर्ग टिकविण्यात निर्मात्यांना यश मिळाले. मालिका किंवा चित्रपटांचे शेड्यूल सांभाळूनही कलाकारांनी रंगभूमीशी असलेली कलेची नाळ तोडली नाही.. यामध्ये अगदी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, रिमा लागू यांपासून ते शरद पोंक्षे, मुक्ता बर्वे, शशांक केतकर अशा अनेक कलाकारांची नावे घेता येतील. या कलाकारांची प्रसिद्धी कॅच करून खूप चांगल्या विषयांवर आधारित नाटके रंगभूमीवर आली आणि प्रेक्षकांना ती भावलीदेखील. मात्र गेल्या काही वर्षांपासून यशस्विततेच्या शिखरावर असलेली नाटके अचानक कोणतीही कल्पना न देता बंद होण्याचे प्रमाण वाढत आहे.
'सखाराम बाईंडर' आणि 'घाशीराम कोतवाल' ही नाटके वादग्रस्त विषयांमुळे प्रेक्षकांनीच बंद पाडली. या दोन नाटकांचा काहीसा अपवाद वगळता आवर्जून उल्लेख करावा, अशी नाटके म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे 'बिघडले स्वर्गाचे दार,' मोहन वाघ यांचे 'रणांगण,' 'बेईमान' यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. बिघडले स्वर्गाचे दार नाटकात देवदेवतांवर विनोद केल्यामुळे निर्मात्यांना काहीसे रोषास सामोरे जावे लागले. त्यामुळे तडकाफडकी हे नाटक बंद करण्याची वेळ आली. 'रणांगण' हे मोहन वाघ यांचे अतिशय गाजलेले असे नाटक. मात्र कलाकार संवादात अँडिशन घ्यायला लागले, कलाकारांच्या आपापसांमधील मतभेदांमुळे चांगले नाटक वाघ यांना गुंडाळावे लागले. 'बेईमान'मध्ये शरद पोंक्षे आणि तुषार दळवी हे कलाकार असूनही केवळ प्रेक्षकांनी पाठ फिरविल्यामुळे नाटक बंद झाल्याची चर्चा नाट्यवर्तुळात होती. प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्या जोडीने हिट ठरवलेले 'एका लग्नाची गोष्ट' हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. मात्र कलाकारांची रिप्लेसमेंट झाल्यामुळे प्रेक्षकांची काही प्रमाणात निराशा झाली. त्यानंतर सध्या रंगभूमीवर फॉर्मात असलेले नाटक म्हणजे 'समुद्र.' चिन्मय मांडलेकर आणि स्पृहा जोशी यांच्या अभिनयाने सजलेले हे नाटक रंगभूमीवर हिट ठरूनही केवळ दोघांमधील मतभेदांमुळे हे नाटक बंद करण्याची घोषणा निर्मात्याला करावी लागली. शरद पोंक्षे यांनीही 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक काही मंडळींच्या त्रासामुळे पुढील वर्षभरात बंद करण्याचे सूतोवाच केले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक नाटके बंद होत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रेक्षकांना चांगल्या नाटकांची भूक आहे. चांगली नाटके रंगभूमीवर येणे ही काळाची गरज आहे. तरच रंगभूमी तग धरू शकेल. तरी निर्मात्यांसह कलाकारांनीही आपापसांतील मतभेद विसरावेत आणि चांगले विषय रंगभूमीवर आणावेत, अशी अपेक्षा प्रेक्षकांकडून व्यक्त केली जात आहे, त्याला निर्माते कसा प्रतिसाद देतात हेच आता पाहावे लागेल!

Web Title: Good play 'Closer' home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.