‘गोटया’चा खेळ ६ जुलैला रंगणार चित्रपटगृहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 05:22 PM2018-06-30T17:22:14+5:302018-06-30T17:24:36+5:30
खेळातून अभ्यासक्रमाबाहेरच्या उपयुक्त गोष्टीसुद्धा आपण शिकवू शकतो हे दाखवतानाच गोटयांची आवड असणाऱ्या ‘गोटया’ या मुलाच्या इर्षेची कथा ‘गोटया’ चित्रपटातून उलगडली जाणार आहे.
खेळातली रंजकता, खेळाडूच्या आयुष्यातील संघर्षाचे प्रतिबिंब आजवर अनेक चित्रपटांतून उमटले आहे. बदलत्या काळाबरोबर खेळही बदलले आहेत. हुतूतू’, ‘लपंडाव’, ‘आंधळी कोशिंबीर’, विटी दांडू’, लगोरी हे पारंपरिक खेळ दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहेत. काही अपवाद वगळता हल्लीची मुले हे खेळ फारसे खेळताना दिसत नाही. आजच्या पिढीला विस्मृतीत गेलेल्या खेळातील गंमत दाखविण्याचा प्रयत्न दिग्दर्शक भगवान वसंतराव पाचोरे व निर्माते जय केतनभाई सोमैया यांनी ‘गोटया’ या आगामी मराठी चित्रपटातून केला आहे. येत्या ६ जुलैला गोट्यांचा खेळ चित्रपटगृहात रंगणार आहे. आरोग्य टिकवायचे असेल निसर्गाशी समतोल राखणारे मातीतले खेळ खेळणे गरजेचे आहे. जीवनात खेळाचं महत्त्व उरलेलं नसल्याचं विदारक चित्र सध्या दिसतं आहे. या पार्श्वभूमीवर येणारा ‘गोटया’ हा चित्रपट क्रीडासंस्कृती टिकविण्यासाठी केलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
खेळातून अभ्यासक्रमाबाहेरच्या उपयुक्त गोष्टीसुद्धा आपण शिकवू शकतो हे दाखवतानाच गोटयांची आवड असणाऱ्या ‘गोटया’ या मुलाच्या इर्षेची कथा ‘गोटया’ चित्रपटातून उलगडली जाणार आहे. हा खेळ शाळेत शिकवावा यासाठी गोटयाने प्रशिक्षकाच्या मदतीने केलेली धडपड रंजकपणे मांडतानाच या खेळाबद्दलच्या विविध गोष्टी जाणण्याची संधी हा चित्रपट देणार आहे. बालपणी जीवापाड जपत खेळलेल्या गोटयांकडे व्यावहारिक जगात केवळ ‘टाइमपास’ म्हणून पाहिलं जात असलं तरी या मानसिकतेला छेद देत ‘गोटया’ हा खेळ कसा उत्तम आहे हे या चित्रपटातून पहायला मिळणार आहे.
खास मुलांच्या भावविश्वाशी जोडल्या जाणाऱ्या मातीतल्या या खेळांमुळे रंजनातून मुलांमधील सर्जनशीलता, त्यांची विचारक्षमता आणि विवेक वाढीस लागतो असे असताना मातीतल्या खेळांचा विसर आज सगळ्यांना पडला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने या खेळांना पुनरुजीव्वन प्राप्त व्हावे व हे खेळ आनंद देऊ शकतात हे सांगण्याचा आमचा उद्देश असल्याचा दिग्दर्शक व निर्माते सांगतात.
संगीतकार अवधूत गुप्ते यांनी ‘गोटया’ चित्रपटाची गाणी संगीतबद्ध केली आहेत. रोहित नागभिडे यांनी या सिनेमाला पार्श्वसंगीत दिलं आहे. भगवान पाचोरे लिखित ‘चला सारे जग जिंकूया’, ‘ढाय लागली’, ‘गोल गोल गोटीचा गोल’ ‘गोटीवर गोटी’, ‘ढाय लागली’ रिमिक्स या पाच गाण्यांना गायक अवधूत गुप्ते, बेला शेंडे, आदर्श शिंदे, जसराज जोशी, कौस्तुभ गायकवाड, आकाश आगलावे यांचा स्वर लाभला आहे. नैनेश दावडा आणि निशांत राजानी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
केतनभाई सोमैया प्रस्तुत, विहान प्रोडक्शन आणि द्वारा मोशन पिक्चरची निर्मिती असलेल्या या चित्रपटात ऋषिकेश वानखेडे, राजेश श्रृंगारपुरे, सयाजी शिंदे, आनंद इंगळे, कमलाकर सातपुते, सुरेखा कुडची, हेमांगी राव, शरद सांखला,शशांक दरणे, पोर्णिमा आहिरे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. कथा-पटकथा-संवाद-गीतलेखन-दिग्दर् शन भगवान पाचोरे यांनी केलं आहे. छायांकन बाशालाल सय्यद यांनी केलं असून, राहुल भातणकर यांनी संकलन केलं आहे. नृत्य दिग्दर्शन गणेश आचार्य यांचे आहे. कलादिग्दर्शन संदीप इनामके यांचे आहे. रंगभूषा ललित कुलकर्णी यांची तर वेशभूषा नामदेव वाघमारे यांची आहे. बाबासाहेब पाटील आणि विशाल चव्हाण या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत. ६ जुलैला ‘गोटया’ प्रदर्शित होणार आहे.