अभिनेते गोविंद नामदेव 'सूर सपाटा'मधून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 03:46 PM2019-03-09T15:46:03+5:302019-03-09T15:46:37+5:30

लाडे ब्रोज् फिल्म्स प्रा. लि आणि मंगेश कंठाळे दिग्दर्शित 'सूर सपाटा' चित्रपट २१ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

Govind Namdev 'Sur Sapata', a Marathi audience meet | अभिनेते गोविंद नामदेव 'सूर सपाटा'मधून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेते गोविंद नामदेव 'सूर सपाटा'मधून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext

'विरासत', 'राजू चाचा', 'पुकार' आणि 'ओह माय गोड' यांसारख्या अनेक दर्जेदार हिंदी चित्रपट व मालिकांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे सुप्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव आता 'सूर सपाटा' या मराठी चित्रपटामध्ये झळकणार आहेत. लाडे ब्रोज् फिल्म्स प्रा. लि आणि मंगेश कंठाळे दिग्दर्शित 'सूर सपाटा' चित्रपट २१ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

गोविंद नामदेव 'सूर सपाटा'मध्ये वरून कडक आणि आतून प्रेमळ अशा गुरुजींच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. चित्रपटात त्यांची भूमिका मध्यवर्ती असून उनाडटप्पू पण कबड्डी खेळण्यात माहीर असणाऱ्या मुलांना त्यांच्याही नकळत अभ्यास आणि खेळ या दोन्हींचे महत्त्व पटवून देणार आहेत. उनाड पण कुशल विद्यार्थ्यांभोवती गुंफलेली 'सूर सपाटा'ची कथा प्रेक्षकांची उत्कंठा टप्प्या-टप्प्याने वाढवणारी कथा मंगेश कंठाळे यांनी लिहिली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील काही सामान्य विद्यार्थ्यांतील असामान्य कौशल्य जाणून त्यांना स्पर्धेमध्ये उतरवू पाहणारे शिक्षक एकीकडे तर आपणही एखादे मैदान मारू शकतो याची जाणीव झालेले विद्यार्थी दुसरीकडे. या दोघांमधला सुवर्णमध्य साधणारा 'सूर सपाटा' प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची एक संधी मिळाली तर तो त्याचे कसे सोने करू शकतो हे दाखवतो. जयंत लाडे निर्मित 'सूर सपाटा' हा त्यांचा दुसरा चित्रपट असून याआधी त्यांनी 'पेईंग  घोस्ट' या विनोदी चित्रपटाची यशस्वी निर्मिती केली होती. 
हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर, सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनावणे आणि निनाद तांबावडे आदींच्या प्रमुख भूमिका 'सूर सपाटा'मध्ये आपल्याला पहायला मिळतील. प्रकाश नाथन, हिमांशू आशेर, संजय पतोडीया आणि अर्शद कमल खान प्रस्तुत, किशोर खिल्लारे, सुभाष गुप्ता, सतीश गुप्ता आणि जगदीश लाडे सहनिर्मित 'सूर सपाटा'च्या निमित्ताने तब्ब्ल २५ दिग्ग्ज कलावंतांचा ताफा आमने-सामने येणार असून तूर्तास त्यांतली काही नावं उलगडण्यात आली आहेत. उपेंद्र लिमये, संजय जाधव, अभिज्ञा भावे ही त्यातलीच काही महत्त्वाची नांदावे आहेत. या चित्रपटाची पटकथा मंगेश कंठाळे व अमित बैचे यांची आहे. तर संवादलेखन अमित बैचे यांनीच केले आहे. चित्रपटाचे छायांकन विजय मिश्रा यांचे असून अभिनय जगतापचे श्रवणीय संगीत चित्रपटाला लाभले आहे.

Web Title: Govind Namdev 'Sur Sapata', a Marathi audience meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.