संजू राठोडने सांगितला गुलाबी साडी गाण्यामागचा किस्सा, फक्त एका तासात रचली चाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 05:01 PM2024-07-28T17:01:20+5:302024-07-28T17:02:55+5:30
नुकतेच एका मुलाखतीत संजूने गुलाबी साडी गाण्यामागचा किस्सा सांगितला.
'गुलाबी साडी' ( Gulabi Sadi ) गाणं गाऊन संजू राठोड प्रसिद्धीझोतात आला. त्याचं हे गाणं आज कित्येकांच्या ओठावर आहे. पार्टीपासून ते अगदी लग्नाच्या वरातीपर्यंत सगळीकडे 'गुलाबी साडी' गाणंच वाजताना दिसत आहे. या गाण्याने अक्षरश: वेड लावलं आहे. आत्तापर्यंत या गाण्यावर हजारो रील्स बनवले गेले आहेत. पण, तरीही या गाण्याची क्रेझ काही कमी होताना दिसत नाही. नुकतेच एका मुलाखतीत संजूने गुलाबी साडी गाण्यामागचा किस्सा सांगितला.
संजू राठोडने एबीपी माझाच्या महाकट्टामध्ये हजेरी लावली होती. यावेळी 'गुलाबी साडी' या गाण्याबद्दल तो म्हणाला, 'कोणालाही समोर ठेवून हे गाणं लिहिलेलं नाही. सगळ्या स्त्रियांना उद्देशून हे गाणं लिहिलं आहे. प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंगाची साडी फार आवडते. माझ्या आईलाही या रंगाची साडी खूप आवडते. त्यामुळे मी गुलाबी साडीवरुनच गाण तयार करायचं ठरवलं होतं'. यासोबतच 'गुलाबी साडी' या गाण्याची संपूर्ण चाल गौरवने एक तासात रचल्याचं त्यानं सांगितलं.
तो म्हणाला, 'मी नेहमी गाणं लिहिताना त्याला कंपोझ करत असतो. माझ्या डोक्यात एक धून आधीच तयार असते. त्याला अनुसरुन मी गाण्याच्या पुढच्या ओळी लिहितो. त्यानंतर मग मी हे संपूर्ण गाणं थोडक्यात तयार करून म्युझिक प्रोड्युसर गौरवला देतो. यावर गौरव म्हणाला, 'आधी आमचं 'नऊवारी साडी' गाणं व्हायरल झालं होतं. त्यामुळे जेव्हा गाणं पाहिलं, तेव्हा मला असं वाटलं. अरे पुन्हा कसं याने साडीवरच गाणं लिहलं. मी त्याला यावेळी साडी नको काहीतरी वेगळं ट्राय करू असं देखील म्हणालो. पण, तो ठाम होता. एकंदर सगळा विचार करून मी हे गाणं एका तासात बसवलं'.
कोणतीही कलाविश्वाची पार्श्वभूमी नसताना गायक संजू राठोडने इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. संजू राठोडने नुकत्याच झालेल्या अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात 'गुलाबी साडी' गाऊन संजू राठोडने वरातीत सर्वांना थिरकायला भाग पाडले. संजू राठोडच्या गाण्यांबद्दल बोलायचं झाल्यास गुलाबी साडीप्रमाणेच त्याची आणखी काही गाणी खूप लोकप्रिय आहेत. त्यामध्ये बाप्पा वाला गाना, नऊवारी साडी, बुलेट वाली, झुमका, डिंपल, बटरफ्लाय यांसारखे गाणी सुपरहिट आहेत.