'आनंदी गोपाळ'ची बॉक्सऑफिस वर यशस्वी घौडदौड !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 06:30 AM2019-03-02T06:30:00+5:302019-03-02T06:30:00+5:30
आनंदी गोपाळच्या या यशाबद्दल झी स्टुडिओजचे, मंगेश कुलकर्णी म्हणाले, “या चित्रपटाची गोष्ट ही प्रत्येक मराठी मनाच्या जवळची आणि अभिमानाची ठरावी अशीच आहे.
मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवणा-या 'आनंदी गोपाळ' चित्रपटाने आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवत दणदणीत यश मिळवले आहे. झी स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या समीर विद्वांस यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि महाराष्ट्रभरचं नव्हे तर परदेशातही तिकीटबारीवर हाऊसफुलचे बोर्ड झळकले. रसिकांनी चित्रपटगृहांवर एकच गर्दी करत यावर आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली. प्रेक्षागृहातून बाहेर पडणारा प्रत्येक प्रेक्षक भारावून गेल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत. चपखल शब्द, अप्रतिम संगीत आणि साजेसे आवाज व गायकी हे जमून येणे म्हणजे नेकमे काय याचा प्रत्यय ‘आनंदी गोपाळ’ ची गाणी ऐकून येतो. आनंदी गोपाळच्या या यशाबद्दल झी स्टुडिओजचे, मंगेश कुलकर्णी म्हणाले, “या चित्रपटाची गोष्ट ही प्रत्येक मराठी मनाच्या जवळची आणि अभिमानाची ठरावी अशीच आहे. प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादाने संपूर्ण टीम आनंदित आहे. मराठीमध्ये चांगल्या सिनेमाच्या पाठीशी प्रेक्षक नेहमी उभा राहतो हे या यशामधून पुन्हा एकदा सिद्ध झालंय."
पहिला चित्रपट सुपरहिट झाला की कलाकाराला ओळख मिळते, मात्र त्याच वेळी त्याच्या पुढे आव्हान निर्माण होते दुसरा चित्रपट निवडण्याचे. अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद त्याबाबतीत ‘आनंदी’ ठरली, कारण ‘बालक पालक’ ने बालकलाकार म्हणून ओळख दिलेल्या भाग्यश्रीच्या वाट्याला कारकीर्दीच्या सुरुवातीलाच एक ऐतिहासिक, आव्हानात्मक भूमिका आली आहे, ती म्हणजे भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची. भाग्यश्री सांगते, आनंदीबाईंची व्यक्तीरेखा पडद्यावर साकारणे हे एक आव्हान होते, आनंदीबाईंचा वय वर्ष १२ ते २१ पर्यंतचा प्रवास समजून घेणे, आनंदीबाईंची बोलण्याची शैली, तत्कालीन स्त्रियांचे जीवनमान, त्या काळातील देहबोली अशा गोष्टी आत्मसात करायच्या होत्या. आनंदीबाई आणि गोपाळराव यांच्याशी असणारे संबंध त्यांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांतून उलगडतात, यामुळे आनंदीबाईंच्या अधिकाअधिक जवळ जाता आले.