जितेंद्र जोशीकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा; शाळेच्या सफाई कामगाराचा व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 01:55 PM2024-01-26T13:55:26+5:302024-01-26T13:57:42+5:30
जितेंद्र जोशीच्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
आज सर्वत्र ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने हा दिवस साजरा करतो. देशातील सर्व शाळा, शैक्षणिक संस्था, कार्यालये इत्यादी ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. सध्या मराठी अभिनेता, लेखक जितेंद्र जोशीच्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यानं खास पद्धतीनं चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
जितेंद्रने त्याच्या इन्स्टाग्रामवर शाळेच्या सफाई कामगाराचा व्हिडीओ शेअर केला.व्हिडीओमध्ये शाळेच्या आवारात सफाई कामगार हा परिसर स्वच्छ करताना दिसतोय. कॅप्शनमध्ये त्यानं लिहले, 'सकाळी 5.30 वाजता ही व्यक्ती शाळा तयार करते आहे. विद्येने बुध्दी प्राप्त होते आणि ज्ञान संपादन करता येतं. खरं ज्ञान हे की अशी असंख्य माणसं आपल्या कळत-नकळत कार्यरत असतात. आपल्यासाठी काम करत असतात. त्यांची आपण दखल घ्यावी आणि त्यांच्यावर प्रेम करावं. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!!!'.
जितेंद्रच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. एका चाहत्यानं कमेंटमध्ये लिहलं, 'समाजातील या कष्टकरी व्यक्तींकडे लक्ष देऊन पाहायला आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायला ही एक संवेदशीलता लागते. सर, आपल्याकडे ती आहे. आपण एक उत्तम अभिनेता, लेखक तर आहातच, परंतू एक उत्तम व्यक्ती ही आहात, हे पुन्हा एकदा जाणवले'. तर आणखी एका युजरने लिहलं, 'फारच सुंदर लिहिलं'.
जितेंद्र जोशी हा प्रतिभावान कलाकार आहे. गेल्या कित्येक वर्ष तो प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. अनेक मराठी चित्रपटांत काम करून त्याने अभिनयाचा ठसा उमटवला. अलिकडेच जितेंद्रच्या 'गोदावरी' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याने फक्त मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही काम केले आहे. तो फक्त अभिनेता नाही तर गीतकारही आहे. त्याने 'मुरांबा' सिनेमातील 'अगं ऐक ना' हे गाणं लिहिलं आहे. याशिवाय जत्रा सिनेमातील लोकप्रिय गाणं 'कोंबडी पळाली' हे गाणं जितेंद्रनेच लिहिलं आहे. जितेंद्र आता 'नाळ २' चित्रपटात दिसणार आहे.