हर हर महादेव: छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यकथा सांगणारा मराठी चित्रपट आता पाच भाषांमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 05:21 PM2022-06-06T17:21:42+5:302022-06-06T17:23:15+5:30

Har Har Mahadev: झी स्टुडिओजने या चित्रपटाची घोषणा केली असून 'हर हर महादेव' हा चित्रपट मराठीसह हिंदी, तामिळ, तेलुगू आणि कन्नड या भाषांमध्ये एकाच दिवशी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Har Har Mahadev new upcoming maratho movie is now available in five languages | हर हर महादेव: छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यकथा सांगणारा मराठी चित्रपट आता पाच भाषांमध्ये

हर हर महादेव: छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यकथा सांगणारा मराठी चित्रपट आता पाच भाषांमध्ये

googlenewsNext

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आणि जगात कुठेही असणाऱ्या मराठी माणसाला सतत प्रेरणा देणारं, ऊर्जा देणारं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि, या अखंड उर्जेला सतत प्रवाही ठेवणारी गोष्ट म्हणजे 'हर हर महादेव' ही शिवगर्जना ! शिवाजी महाराजांचं कार्य त्यांची थोरवी याचं आकर्षण, कुतूहल आजही अनेकांच्या चर्चेचा, अभ्यासाचा विषय असतो. केवळ महाराष्ट्रातच नाही. तर, इतर भारतीय भाषिकही महाराजांच्या कार्यावर संशोधन करतात.  महाराजांचा हाच महिमा 'हर हर महादेव' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर उलगडला जाणार आहे. 

झी स्टुडिओजने या चित्रपटाची घोषणा केली असून 'हर हर महादेव' हा चित्रपट मराठीसह हिंदी, तामिळ, तेलुगू आणि कन्नड या भाषांमध्ये एकाच दिवशी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. मराठी चित्रपटांच्या इतिहासात आजवर कधीही न घडलेली अशी ही घटना हर हर महादेवच्या निमित्ताने घडणार आहे. अभिजित देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनाने सजलेला हा चित्रपट दिवाळीमध्ये सर्वांच्या भेटीस येणार आहे. 
दक्षिणेकडील सिनेमाचं दैदिप्यमान यश, हिंदी भाषेत डब (भाषांतरीत) होऊन सर्वदूर पोहोचलेला दक्षिण सिनेमा आज सर्वांवर गारुड करण्यात यशस्वी झालाय. आपला मराठी सिनेमा असा भव्य दिव्य कधी बनणार ? तो इतर भाषांमध्ये कधी प्रदर्शित होणार ? याबद्दलच्या चर्चा आपण नेहमी करतो किंवा ऐकतो. या प्रश्नांना आणि चर्चांना आता एक सकारात्मक उत्तर मिळणार आहे.

"छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यच इतकं महान आणि भव्य आहे की ते फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहू शकत नाही. महाराजांची युद्धनीती ,संघटन कौशल्य जगभरात अभ्यासलं जातं . आज इतर भाषांमधील काल्पनिक गोष्टी आपल्याला मोहवून टाकत आहेत  त्यामुळे  आपला खरा, प्रेरणादायी आणि देदीप्यमान असा इतिहास तेवढ्याच भव्यतेने जगासमोर आलाच पाहिजे ही भावना आमच्या मनात होती. या भावनेतूनच आम्ही हर हर महादेव सर्व भारतात पाच भाषांमध्ये प्रदर्शित करायचं ठरवलं आहे. या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याची व्हिएफएक्स टीम. अनेक हॉलिवूडपटांवर काम करणारे  व्हिएफएक्स तंत्रज्ञ यावर काम करत असून तब्बल ४०० हुन अधिक तंत्रज्ञांचा यात समावेश आहे," असं झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी म्हणाले.

दरम्यान, सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजित देशपांडे करत आहेत. हा चित्रपट येत्या दिवाळीत हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Har Har Mahadev new upcoming maratho movie is now available in five languages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.