"अत्यंत मोठ्या मनाने त्यांनी माफी मागितली...", प्राजक्ता माळीने सुरेश धस यांचे मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 15:45 IST2024-12-31T15:45:01+5:302024-12-31T15:45:36+5:30
Prajakta Mali on Suresh Dhas : भाजपा आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीची माफी मागितल्यानंतर आता अभिनेत्रीने त्यांचे आभार मानले आहेत.

"अत्यंत मोठ्या मनाने त्यांनी माफी मागितली...", प्राजक्ता माळीने सुरेश धस यांचे मानले आभार
अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'फुलवंती' या सुपरहिट चित्रपटामुळे चर्चेत होती. मात्र आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. बीडमध्ये सरपंच हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर आरोप होत आहेत. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना परळी पॅटर्न म्हणत भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी प्राजक्ता माळीचे नाव घेतले होते. त्यावरुन प्राजक्ताने थेट त्यांची महिला आयोगात तक्रार केली आणि पत्रकार परिषद घेत राजकारण्यांना खडेबोल लगावले होते. त्यानंतर सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीची प्रसारमाध्यमांसमोर माफी मागितली. दरम्यान आता प्राजक्ता माळीने सुरेश धस यांचे आभार मानले आहेत.
प्राजक्ता माळी म्हणाली की, तुम्हा सगळ्यांना माझा नम्रतापूर्वक नमस्कार. संबंध महाराष्ट्राचे मी सर्वप्रथम मनापासून आभार मानते. पत्रकार परिषद घेतल्यापासून मी आणि माझे कुटुंब यांना शेकडो मेसेज, फोन कॉल्स आणि सोशल मीडिया टॅग आले. महिलांच्या सन्मानासाठी समाजातील सर्व स्तरातून आवाज उठवला गेला, पाठिंबा दिला गेला. समर्थन दिले गेले. त्यामुळे आम्हाला खूप बळ मिळाले. समाधान वाटले. खूप धन्यवाद. त्याचबरोबर माननीय आमदार सुरेश धस यांचेदेखील मी मनापासून आभार मानते. त्यांनी अत्यंत मोठ्या मनाने समस्त महिला वर्गाची माफी मागितली. दिलगिरी व्यक्त केली. दादा खूप धन्यवाद. असे करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाइक आहात, हे दाखवून दिले. छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती, हे आपण सगळे जाणतो आणि छत्रपतींची ही भूमी आहे. त्यांचे विचार पुढे इथे चालवले जातील, हेच तुम्ही या कृतीतून दाखवून दिले.
गेल्या दोन दिवसांपासून आणखी दोन मुद्दे चर्चिले गेले. या निमित्ताने बोलू इच्छिते. धस साहेब बोलले त्यामुळे मला पत्रकार परिषद घ्यावी लागली. जर ते बोलले नसते तर मी आज तुमच्यासमोर नसते. त्यामुळे कुठलेही आंदोलन, मोर्चा किंवा मोहीमेचे लक्ष विचलित करण्याचा हेतू नव्हता. माझ्या मार्फत दुसऱ्या कोणाचा हा हेतू नव्हता हेदेखील मी इथे नमूद करु इच्छिते. खरोखरच धस साहेब बोलले नसते तर मला हे करायची गरजच पडली नसती. त्यामुळे कोणीही त्यातून गैरअर्थ काढू नये, अशी विनंती यावेळी प्राजक्ताने केली.
''कोणतीही कायदेशीर कारवाई करू इच्छित नाही''
प्राजक्ता माळी पुढे म्हणाली की, आमदार साहेबांनी माफी मागितल्यामुळे मी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही आहे. करू इच्छित नाही. आज या संपूर्ण प्रकरणावर माझ्याकडून पडदा टाकते आहे.