“छत्रपती शिवरायांची समाधी शोधून..." छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी वादावर हेमंत ढोमेची ती पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 02:31 PM2022-05-03T14:31:26+5:302022-05-03T14:45:17+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांनी औरंगाबादच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली असा दावा केला. यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांनी औरंगाबादच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली असा दावा केला. राज यांच्या दाव्यावर राज्यातील राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकारण्यासोबतच कलाकार मंंडळीही यावर आपली प्रतिक्रिया देतायेत.
मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक आणि कलाकार हेमंत ढोमे यानेही यावर आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
हेमंत ढोमने ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. हेमंतने आपल्या ट्विटरवर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर “छत्रपती शिवरायांची समाधी शोधून सर्वात पहिली शिवजयंती साजरी करणारे थोर युगपुरुष” असे लिहिली आहे. “क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले” असे कॅप्शन त्याने दिले आहे. हेमंतच्या या ट्विटनंतर काही जणांनी त्याला ट्रोल केलंय तर काहींनी त्यांचं समर्थन केलंय.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले!!!! pic.twitter.com/flZaKuqnfG
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) May 1, 2022
काय म्हणाले होते राज ठाकरे?
औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीवादाचा आरोप करत ते छत्रपती शिवाजी महाराज यांचं कधी नाव घेत नाहीत असं म्हटलं. त्याचसोबत फुले-शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहेच परंतु त्याआधी तो छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. राष्ट्रवादीच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीय द्वेष वाढला. रायगडावरची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली हे शरद पवार कधी सांगत नाहीत असंही राज ठाकरेंनी दावा केला होता.
लोकमान्य टिळकांच्या कामाला कोणाची पावती नकोय
राज ठाकरेंच्या विधानावर आक्षेप घेत राष्ट्रवादी नेत्यांनी टिळकांनी पैसे गोळा केले परंतु समाधी बांधली नसल्याचं म्हटलं. त्यावर लोकमान्य टिळक यांच्या कामाला कोणाचीच पावती नको. कोणी ती द्यायचा प्रयत्नही करू नये. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टिळकांच्या हृयातीत बांधली गेली नसेल. मात्र समाधी व्हावी यासाठी त्यांनी कायकाय केले ते मराठी जनतेला आजही चांगलेच माहिती आहे, अशा शब्दात लोकमान्यांचे खापर पणतू कुणाल टिळक यांनी समाधीवरून सुरू असलेल्या राजकारणाला उत्तर दिले.