2024 मध्ये येणार हेमंत ढोमेचा नवा सिनेमा?; निर्मिती सावंत झळकणार महत्त्वपूर्ण भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 09:09 IST2023-12-28T09:08:05+5:302023-12-28T09:09:06+5:30
Hemant dhome: हेमंत ढोमेने त्याच्या नव्या सिनेमाची हिंट दिल्यामुळे आता या सिनेमाविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

2024 मध्ये येणार हेमंत ढोमेचा नवा सिनेमा?; निर्मिती सावंत झळकणार महत्त्वपूर्ण भूमिकेत
मराठी कलाविश्वासाठी २०२३ हे वर्ष चांगलंच खास ठरलं आहे. 'बाईपण भारी देवा', 'झिम्मा 2' असे अनेक सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजले. हे सिनेमा केवळ गाजलेच नाहीत तर त्यांनी बॉलिवूड सिनेमांनीही तगडी टक्कर दिली. यामध्येच हेमंत ढोमे याचा 'झिम्मा 2' हा सिनेमा सरत्या वर्षाच्या शेवटी सुद्धा बॉक्स ऑफिसवर गड राखून आहे. त्यामुळे या सिनेमाची सातत्याने चर्चा रंगत आहे. विशेष म्हणजे झिम्मा आणि झिम्मा 2 या दोन्ही सिनेमांना मिळालेल्या यशानंतर हेमंत ढोमेने ((Hemant Dhome) त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.
अलिकडेच हेमंतने ‘इट्स मज्जा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीच्या ‘राउंड टेबल’ या सेगमेंटमध्ये बोलत असताना त्याने त्याच्या नव्या सिनेमाची हिंट प्रेक्षकांना दिली आहे. इतकंच नाही तर या नव्या सिनेमात पुन्हा एकदा अभिनेत्री निर्मिती सावंत (nirmiti sawant) झळकणार असल्याचंही त्याने सांगितलं आहे. त्यामुळे हेमंतचा नवा सिनेमा कोणता असेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.
"मी, सिद्धार्थ आणि क्षिती आम्ही २०२४ च्या नोव्हेंबरमध्ये निर्मिती ताईला घेऊन सिनेमा करणार आहोत", असा खुलासा हेमंतने केला. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हेमंत त्याच्या नव्या सिनेमाच्या तरयारीला लागणार असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, हेमंतने या नव्या सिनेमाविषयी भाष्य केल्यानंतर त्याचा आगामी सिनेमा कोणता असेल, त्याचं नाव काय, त्यात कोणते कलाकार झळकणार, सिनेमाची कथा काय असेल असे असंख्य प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. या मुलाखतीमध्ये हेमंतसोबत क्षिती जोग, निर्मिती सावंत आणि सिद्धार्थ चांदेकर यांनीही हजेरी लावली होती.