"कुठे आहे हाऊसफुल? आमच्याकडे काळं कुत्र नाही", म्हणणाऱ्या नेटकऱ्याला हेमंतचा शाब्दिक मार, म्हणाला, "कारण, सिनेमा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 16:04 IST2023-12-04T16:02:37+5:302023-12-04T16:04:44+5:30
'झिम्मा २' हाऊसफूल! नेटकऱ्याच्या 'त्या' कमेंटवर हेमंत ढोमेने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला...

"कुठे आहे हाऊसफुल? आमच्याकडे काळं कुत्र नाही", म्हणणाऱ्या नेटकऱ्याला हेमंतचा शाब्दिक मार, म्हणाला, "कारण, सिनेमा..."
'झिम्मा २' या मराठी चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. अनेक बॉलिवूड सिनेमांना 'झिम्मा २' बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर देत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. खासकरुन महिला प्रेक्षकवर्गाच्या पसंतीस हा सिनेमा उतरला आहे. ठिकठिकाणी या चित्रपटाचे शो हाऊसफूल होत आहेत. सिनेमागृहात 'झिम्मा २'चे हाऊसफुल बोर्ड पाहून दिग्दर्शक हेमंत ढोमे भारावून गेला आहे. त्याने याबाबत इन्स्टावर एक पोस्टही शेअर केली आहे.
हेमंत ढोमेने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन 'झिम्मा २'च्या टीमचा कलाकारांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये झिम्मा २च्या टीमच्या हातात हाऊसफुल बोर्ड पाहायला मिळत आहेत. हा फोटो शेअर करत हेमंत ढोमेने "जगभरात खरंच ‘जगभरात’ सर्वत्र HOUSEFULL!कृतज्ञ...कृतज्ञ...कृतज्ञ", असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. त्याच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे. "आमच्या इकडं तर एक काळ कुत्र जात नाहीये, कसं आणि कुठं चालू आहे हाउसफुल्ल हे", असं नेटकऱ्याने कमेंटमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या कमेंटवर हेमंत ढोमेने सडेतोड उत्तर दिलं आहे.
पोस्टवर कमेंट करणाऱ्या या नेटकऱ्याला हेमंत ढोमेने त्याच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. "कारण सिनेमा माणसांसाठी बनवलाय! त्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल...", असा रिप्लाय हेमंतने दिला आहे. हेमंतने दिलेला रिप्लाय पाहून नेटकरीही त्याचं कौतुक करत आहेत.
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' हा २०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा'चा सिक्वल आहे. या सिनेमाने पहिल्या आठवड्यात ७.३८ कोटींचा गल्ला जमवला आहे. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, क्षिती जोग, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर अशी या सिनेमाची स्टारकास्ट आहे.