"'नथुराम गोडसे’ नाटकाच्या नावात नवीन काही जोडू नका", शरद पोंक्षेंना हायकोर्टाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 06:09 PM2023-11-03T18:09:10+5:302023-11-03T18:09:26+5:30

'नथुराम गोडसे' या नाटकामुळे शरद पोंक्षे चर्चेत आले होते. या नाटकाच्या नावामुळे नवीन वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी आता उच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. 

High Court directs Sharad Ponkshe not to add anything new to the name of the play Nathuram Godse | "'नथुराम गोडसे’ नाटकाच्या नावात नवीन काही जोडू नका", शरद पोंक्षेंना हायकोर्टाचे निर्देश

"'नथुराम गोडसे’ नाटकाच्या नावात नवीन काही जोडू नका", शरद पोंक्षेंना हायकोर्टाचे निर्देश

मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेता शरद पोंक्षे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. शरद पोंक्षे अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीबरोबरच त्यांच्या रोखठोक व्यक्तिमत्त्वासाठीही ओळखले जातात. समाजातील अनेक घडामोडींवर ते परखडपणे त्यांचं मत व्यक्त करताना दिसतात. 'नथुराम गोडसे' या नाटकामुळे शरद पोंक्षे चर्चेत आले होते. या नाटकाच्या नावामुळे नवीन वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी आता उच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. 

रंगभूमीवर आणलेल्या नव्या नाटकाच्या नावात 'नथुराम गोडसे बोलतोय' ऐवजी 'नथुराम गोडसे' असा बदल केल्याची माहिती शरद पोंक्षे यांनी बुधवारी(१ नोव्हेंबर) उच्च न्यायालयाला दिली. त्यावर 'नथुराम गोडसे' या नव्या नावात यापुढे नवीन काही जोडू नका, असे निर्देश न्यायमूर्ती रियाझ छागला यांनी शरद पोंक्षे यांना दिले आहेत. या प्रकरणी ३० नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

माऊली भगवती प्रॉडक्शन्सच्या नव्या नाटकातील संहिता, सादरीकरण व ट्रेडमार्कचे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या मूळ नाटकाशी साधर्म्य असल्याने आमच्या व्यावसायिक हक्कांचे उल्लंघन होत आहे, असा आरोप करीत ‘माऊली प्रॉडक्शन्स’चे
मालक व निर्माते उदय धुरत यांनी माऊली भगवती प्रॉडक्शन्सचे मालक प्रमोद धुरत व अभिनेते शरद पोंक्षे यांच्याविरूद्ध दावा दाखल केला आहे. या प्रकरणी बुधवारी न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या पुढे सुनावणी झाली. मागील सुनावणी वेळी नव्या नाटकाच्या नावात बदल करण्याची तयारी पोंक्षे यांनी दर्शवली होती. त्यासाठी सेन्सॉर मंडळाची परवानगी मिळवून ‘नथुराम गोडसे बोलतोय’ ऐवजी ‘नथुराम गोडसे’ असा बदल केल्याचे पोंक्षेंच्या वकिलांनी न्यायालयाला कळवले. या बदलाला आक्षेप नसल्याचे निर्माते उदय धुरत यांच्यातर्फे वकील हिरेन कमोद व वकील महेश म्हाडगुत यांनी सांगितले.

मूळ नाटकातील नवा नथुराम गोडसे अभिनेता सौरभ गोखले 

निर्माते उदय धुरत त्यांच्या माऊली प्रॉडक्शन्सचे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक नव्याने रंगभूमीवर येत असताना ‘नथुराम’च्या भूमिकेचे आव्हान कोण पेलणार याविषयी कमालीची उत्सुकता होती. नथुरामच्या भूमिकेसाठी सुमारे २५-३० कलाकारांच्या ऑडिशन्स या नाटकाचे पुर्नदिग्दर्शन करणारे दिग्दर्शक विवेक आपटे आणि उदय धुरत यांनी घेतल्या होत्या. त्यानंतर अभिनेता सौरभ गोखलेची निवड झाली. सौरभ ही आव्हानात्मक भूमिका कशी साकारणार याकडे नाट्यरसिकांसह नाट्यसृष्टीचे लक्ष लागले असून नाटकाच्या तालमी मुंबईत सुरु असून लवकरच हे नाटक रसिकांना पहायला मिळणार आहे असे निर्माते उदय धुरत म्हणाले. 
 

Web Title: High Court directs Sharad Ponkshe not to add anything new to the name of the play Nathuram Godse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.