कसा झालेला लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मृत्यू?, जवळच्या मित्रांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 08:00 AM2023-05-26T08:00:00+5:302023-05-26T08:00:01+5:30
अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी २००४ साली जगाचा निरोप घेतला.
लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांना बालपणापासून अभिनयाची आवड होती. सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्याआधी ते लॉटरीची तिकिटे विकत होते. त्यांनी आपल्या अभिनय आणि विनोदी कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. १९८४ साली आलेला चित्रपट लेक चालली सासरला, १९८५ साली धूमधडाका चित्रपटातून त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. त्यांनी विनोदी भूमिकांसोबतच गंभीर भूमिकाही अगदी दमदार पद्धतीने साकारल्या. मात्र त्यांचा मृत्यू हा सगळ्यांच्या जीवाला चटका लावून गेला. पण त्यांचं निधन कशामुळे झाले हे आजही बऱ्याच लोकांना माहित नाही.
लक्ष्मीकांत बेर्डे शेवटच्या काळात पूर्णपणे खचले होते. त्यांना किडनीचा गंभीर आजार झाला होता. त्यांचे मित्र अभिनेते दीपक शिर्के यांनी एका मुलाखतीत त्यांच्या शेवटच्या दिवसांवर भाष्य केले होते. ते म्हणाले, 'लक्ष्मीकांत शेवटच्या काळात असुरक्षिततेच्या भावनेत बुडाला होता. भरत जाधवसारख्या नव्या नटांचे आगमन होत होते. नवीन नटांच्या स्पर्धेत आपण टिकू का अशी भीती कदाचित त्याला वाटत होती. सर्वच अभिनेते असुरक्षिततेच्या भावनेत पछाडलेले असतात. लक्ष्मीकांतने या असुरक्षिततेमुळे स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले. खाण्या-पिण्याकडे खूप दुर्लक्ष केले.
ते पुढे म्हणाले की, खरेतर लक्ष्मीकांत एवढा टॅलेंटेड होता की, त्याने इतके असुरक्षित वाटून घेण्याची फारशी गरज नव्हती. त्याच्या जाण्याने माझ्यासारख्या अनेक लोकांचे वैयक्तिक नुकसान झाले हे खरे.'
अभिनेत्याने २००४ साली घेतला जगाचा निरोप
आणखी एका अभिनेत्याने त्यांच्या शेवटच्या दिवसांबाबत वर्णन करताना म्हटले होते की, 'आम्हाला त्याला त्या अवस्थेत पाहणे कठीण झाले होते. त्याची अवस्था वाईट होती. तो खात पित नव्हता. फार कुणाशी बोलत नव्हता.' त्यांच्या किडनीवरील आजारावर अनेक वर्ष उपचार सुरू होते मात्र अखेर तो दिवस आलाच आणि आपल्या विनोदामुळे खळखळून हसवणाऱ्या या अभिनेत्याने २००४ साली जगाचा निरोप घेतला.