थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर ह्रता दुर्गुळेचा 'टाईमपास ३' येणार OTT वर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 04:55 PM2022-09-01T16:55:00+5:302022-09-01T16:56:17+5:30
Timepass 3: रवी जाधव दिग्दर्शित टाईमपास ३ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे.
रवी जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित 'टाईमपास ३' (Timepass 3) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. झी५ या ओटीटीवर 'टाइमपास ३' या चित्रपटाचा १६ सप्टेंबर रोजी प्रीमिअर होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले असून या फ्रंचायझीमध्ये प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
दिग्दर्शक रवी जाधव यांनी २०१४ मध्ये टाइमपास हा चित्रपट रिलीज झाला होता आणि २०१५ रोजी या चित्रपटाचा सीक्वलही प्रदर्शित झाला. पहिल्या चित्रपटात दगडू व प्राजक्ता या दोन शाळकरी वयातील मुलांची प्रेमकहाणी दाखविण्यात आली होती. प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर यांनी या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. टाइमपास २ चे कथानक १५ वर्षांनी घडते असे दाखविण्यात आले होते आणि या चित्रपटाच प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या फ्रंचायझीच्या तिसऱ्या भागात ही कथा पुन्हा एकदा दगडूकडे वळते, जी व्यक्तिरेखा पुन्हा एकदा प्रथमेश परबनेच साकारली आहे. या फ्रंचायझीचे तीनही भाग झी ५ वर उपलब्ध आहेत.
या वेळी दगडूने त्याची बारावीची परीक्षा ३६% गुण मिळवून उत्तीर्ण केली आहे आणि आता तो कॉलेजमध्ये जाणार आहे. दगडूला त्याचे गुंडगिरीचे दिवस विसरून नवी सुरुवात करायची आहे. पण त्याच्या या प्रवासात अनेक जण त्याची वारंवार परीक्षा घेत असतात. कारण त्यांच्या मते दगडू बदलणे शक्यच नाही. त्याला आपली ही नवी प्रतिमा कायम ठेवणे गरजेचे असते. कारण तो आता त्याच्या वर्गात असलेल्या पालवीच्या प्रेमात पडला आहे. पालवी एका गँगस्टरची मुलगी आहे. दगडूच्या ‘जंटलमन’ प्रतिमेची पालवीला भुरळ पडली आहे. पण कोणत्याही चांगल्या गोष्टींचा कधी ना कधी शेवट होतो, तसे दगडूने पांघरलेली ही झूलही उतरते. असे झाल्यावर दगडू-पालवीच्या नात्यावर काही परिणाम होतो का, हे या चित्रपटात उलगडणार आहे.
'टाइमपास ३' या चित्रपटाला IMDB वर ७.३ इतके मानांकन मिळाले आहे आणि या चित्रपटात संजय नार्वेकर, भाऊ कदम, वैभव मांगले यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपट निखळ मनोरंजन करणारा चित्रपट आहे, ज्यात विनोद व रोमान्स भरपूर आहे. अथांश कम्युनिकेशन आणि झी स्टुडियोजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचा १६ सप्टेंबर रोजी झी ५ वर प्रीमिअर होणार आहे.