रंगभूमीवर विनोदाची खणखणीत फटकेबाजी, "हयांचं करायचं काय"नवीन नाटक रसिकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 10:51 AM2019-06-13T10:51:22+5:302019-06-13T10:53:04+5:30
विजय आणि मंगल भुते हया वृद्ध जोडप्याची कथा “हयांचं करायचं काय” या नाटकात पाहायला मिळेल.
निखळ करमणूकीतून समाज प्रबोधन तसेच बौद्धीक विचारांना चालना देण्याचं काम खरं पाहिलं तर मराठी नाटकांतूनच गेली अनेक शतकं अव्याहतपणे चालू आहे. करमणुकीबरोबरच मानवी नात्यातील संघर्ष आणि ओलावा हया दोहोंची प्रचिती नाटकाद्वारे मोठ्या प्रमाणात प्रतित होते. असंच करमणूकीतून सध्याच्या स्वार्थी नात्यांचं पदर उलगडून दाखवणारं “हयांचं करायचं काय” हे विनोदी नाटक रंगभूमीवर येत असून हया नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शुक्रवार १४ जूनला होणार आहे.
लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते राजेश देशपांडे यांनी हया नाटकाचे दिग्दर्शन, गीतरचना आणि संहिता संस्करण केले आहे. नाटकात पंढरीनाथ कांबळे, विशाखा सुभेदार आणि समीर चौघुले हया नाटकात प्रमुख भुमिकेत असून त्यांच्या विनोदाचा आविष्कार हया नाटकात पाहायला मिळणार आहे.
“हयांचं करायचं काय” हया नाटकाची कथा आहे विजय आणि मंगल भुते हया वृद्ध जोडप्याची. कोल्हापूरच्या एका आडगावात आपल्या वडीलोपार्जित वाड्यात ते राहतात. एक दिवस पोपट जाधव हा दलाल हा वाडा विकत घेण्यासाठी येतो. आणि मग सुरू होते एकामागून एक धम्माल प्रसंगांची हास्यकल्लोळ मालिका. हे नाटक प्रेक्षकांना निश्चितच भावेल असा निर्माता – दिग्दर्शकांना विश्वास आहे. नाटकाचा अनपेक्षित शेवट प्रेक्षकांना निश्चितच अंतर्मुख करणारा असून मनोरंजनाचे फुल पॅकेज हया नाटकात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.