"मला नेहमीच हा गणवेश घालायचा होता...", ललित प्रभाकरने शेअर केला 'ग्राउंड झिरो'मधील त्याचा लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 18:33 IST2025-04-10T18:32:45+5:302025-04-10T18:33:12+5:30
Lalit Prabhakar : इमरान हाश्मीचा आगामी चित्रपट 'ग्राउंड झिरो'मध्ये अभिनेता ललित प्रभाकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

"मला नेहमीच हा गणवेश घालायचा होता...", ललित प्रभाकरने शेअर केला 'ग्राउंड झिरो'मधील त्याचा लूक
सध्या इमरान हाश्मी(Emraan Hashmi)चा आगामी चित्रपट 'ग्राउंड झिरो'(Ground Zero Movie)ची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या सिनेमात इमरान हाश्मीसोबत अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सई व्यतिरिक्त या चित्रपटात आणखी एक मराठमोळा चेहरा दिसणार आहे तो म्हणजे ललित प्रभाकर (Lalit Prabhakar). नुकतेच या चित्रपटासंदर्भातील पोस्ट अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
ललित प्रभाकरने 'ग्राउंड झिरो'मधील त्याच्या लूकमधला फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, मला नेहमीच हा गणवेश घालायचा होता... किमान रिल लाईफमध्ये तरी तो घालण्याचे भाग्य लाभले. भारतीय सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल प्रचंड आदर वाटतो. ग्राउंड झिरो सिनेमा २५ एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ललितच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अनेकांना त्याचा लूक खूप आवडला आहे.
ग्राउंड झिरो सिनेमात इमरान हाश्मी एका लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सई ताम्हणकर सिनेमात बीएसएफ जवान नरेंद्र दुबे यांच्या पत्नीची भूमिका निभावत आहे. ललित त्यांच्या सहकाऱ्याच्या भूमिकेत आहे. २००१ मध्ये दिल्लीतील संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या सीक्रेट मिशनवर आधारीत हा सिनेमा आहे. हा चित्रपट २५ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.