"मी जन्माने मारवाडी, पण मी अमराठी नाही...", जितेंद्र जोशीच्या वक्तव्यानं वेधलं सर्वांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 10:11 AM2023-11-20T10:11:03+5:302023-11-20T10:11:30+5:30
Jitendra Joshi : अभिनेता जितेंद्र जोशी नुकताच 'नाळ २' चित्रपटात पाहायला मिळाला. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्याने अमराठीवर केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे जितेंद्र जोशी (Jitendra Joshi). जितेंद्रनं आतापर्यंत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्याने मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. नुकताच तो 'नाळ २' (Naal 2) चित्रपटात पाहायला मिळाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जितेंद्र जोशीने केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. तो म्हणाला की, मी जन्माने मारवाडी असलो तरी मी अमराठी नाही.
जितेंद्र जोशी म्हणाला की, जन्माने मी मारवाडी असलो तरी मी अमराठी नाही, मी मराठीच आहे. राजस्थानमध्ये जन्माला आलेला मुसलमान हा मारवाडी असतो तसाच महाराष्ट्रात जन्माला आलेला मारवाडी हा मराठीच आहे. जोशी आडनाव असल्यामुळे कित्येकदा जितेंद्रला मराठीच असल्याचे म्हटले गेले होते. परंतु तो मारवाडी आहे, याचा खुलासा त्यानेच अगोदर केलेला होता.
असा माझा 'नाळ २'मध्ये झाला प्रवेश
नाळ २ चित्रपटाबद्दल जितेंद्र जोशी म्हणाला की, नाळ भाग २साठी मला नागराजने विचारले. तो मला म्हणाला की, छोटी भूमिका आहे, पण खूपच महत्त्वाची आहे. तर करशील का? त्यावर मी त्याला म्हणालो की, तू करतोयस हा चित्रपट तर मी काम का नाही करणार. असा माझा नाळ २मध्ये प्रवेश झाला.
'नाळ २'बद्दल...
२०१८ साली प्रदर्शित झालेला नाळ चित्रपटातील चैतू आता मोठा झाला आहे आणि आता तो आपल्या खऱ्या आईवडिलांना भेटण्यासाठी गेला आहे. इतकी वर्ष आपल्या आई वडिलांपासून तो लांब का राहिला होता, की त्याला लांब ठेवण्यात आले होते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दुसऱ्या भागात मिळणार आहे. हा चित्रपट १० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला.