मी कुठल्याही गटाची नाही, अभिनेत्री स्मिता तांबेचं चित्रपटसृष्टीतील गटबाजीवर परखड मत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 08:00 PM2019-08-24T20:00:00+5:302019-08-24T20:00:00+5:30
सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार म्हणून रसिकांपर्यंत पोहोचायचं, त्याव्यतिरिक्त काहीही नको असं स्मिताने म्हटलं आहे.
आपल्या अभिनयाने चित्रपट आणि रंगभूमीवर रसिकांची मने जिंकलेली अभिनेत्री म्हणजे स्मिता तांबे. स्मिताने मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. 'जोगवा', '७२-माईल्स', 'परतु', 'देऊळ' यासह विविध मराठी सिनेमात तसंच 'सिंघम रिटर्न्स', 'रुख' अशा बॉलीवुडच्या सिनेमातही स्मिताने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. अभिनयासह अनेक कलाकार दिग्दर्शनात नवीन इनिंग सुरू करतात. मात्र स्मिताचा सध्या दिग्दर्शनाचा कोणताही विचार नाही. जोवर आपल्यातील अभिनेत्री जिवंत आहे तोवर दिग्दर्शनाचा कोणताही विचार नाही असं स्मिताने स्पष्ट केले आहे.
चित्रपटसृष्टीत गटबाजी असल्याचंही ऐकायला मिळतं. मात्र या गटबाजीबाबत काहीही प्रतिक्रिया देणं तिला योग्य वाटत नाही. मात्र आपण कुठल्याही गटात नसल्याचेही ती आवर्जून सांगते. सोशल मीडिया वापराबाबतही स्मिता आपली मतं ठामपणे मांडते. सध्याचा काळ सोशल मीडियाचा आहे, त्यामुळे सोशल मीडियाला वगळून चालणार नाही असं स्मिता म्हणते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार म्हणून रसिकांपर्यंत पोहोचायचं, त्याव्यतिरिक्त काहीही नको असं स्मिताने म्हटलं आहे. या कामात तिला तिची टीम मदत करत असते. सोशल मीडिया इतकं व्यापलेलं नव्हतं तेव्हाही कामं व्हायची यावर अजूनही विश्वास असल्याचं स्मिताला वाटतं. आपलं वैयक्तिक आयुष्य वेगळं असून बाहेर कामाच्या ठिकाणी वेगळी असते असं सांगायलाही ती विसरत नाही.