पुन्हा पुन्हा गौतम जगायला मिळतो हे भाग्यच – स्वप्नील जोशी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 08:30 AM2018-12-07T08:30:00+5:302018-12-07T08:30:00+5:30
मराठीतील आघाडीची जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे पुन्हा एकदा दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्याबरोबर एकत्र आले आहेत.
‘मुंबई पुणे मुंबई’चे तीन भाग प्रेक्षकांसमोर आले. हा मराठी चित्रपट क्षेत्रातील विक्रमच आहे. या तीन भागातील गौतमच्या भूमिकेबद्दल स्वप्नील फार अभिमानाने बोलतो. “फार कमी कलाकारांच्या वाट्याला एकच भूमिका पुन्हा पुन्हा जगण्याची संधी येते. ‘मुंबई पुणे मुंबई-३’च्या निमित्ताने मला ती मिळते आहे. दोन-चार वर्षांनी पुन्हा गौतमला भेटायला मिळते. पुन्हा त्याच टीमसोबत काम करायला मिळते. त्यामुळेच ‘मुंबई पुणे मुंबई’चा हा प्रवास माझ्यासाठी स्पेशल आहे,” असे उद्गार चित्रपटाचा नायक स्वप्नील जोशी याने काढले आहेत.
स्वप्नील पुढे म्हणाला की, मुंबई-पुणे-मुंबईला सुरुवात केली तेव्हा या सिनेमाचा तिसरा भाग होईल याचा विचारच केला नव्हता. “या सिनेमामुळे गौतम आणि गौरीच्या व्यक्तिरेखा आम्हाला पुन्हा पुन्हा जगायला मिळत आहे. हा सगळा प्रकार आमच्यासाठी स्वप्नवत आहे. या सिनेमाशी आमच्या खूप आठवणी जोडल्या गेल्या आहेत.
‘मुंबई पुणे मुंबई ३’ या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, प्रशांत दामले, सविता प्रभुणे, सुहास जोशी, मंगल केंकरे आणि विजय केंकरे हे मराठीतील लोकप्रिय कलाकारही महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसले आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांचे आहे तर ‘एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट’चे संजय छाब्रिया निर्माते आहेत. ‘52 फ्रायडे सिनेमाज’चे अमित अमित भानुशाली चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात व्ही शांताराम यांच्या अजरामर ‘पिंजरा’मधील ‘गं साजणी” हे गाणे पुनरुज्जीवित केले गेले आहे. या गाण्यात स्वप्नील आणि मुक्ता बर्वे यांनी धमाल केली आहे.