"मागील ११ वर्षांपासून मी हा त्रास सहन करतोय आणि अद्याप ही लढाई संपलेली नाही..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 04:44 PM2021-08-05T16:44:45+5:302021-08-05T16:46:12+5:30

सुरेश वाडकर आणि सोनू निगम यांची एका प्रकरणात फसवणूक झाली आहे. त्यासाठी त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

"I have been suffering for the last 11 years and this battle is not over yet ...", Said famous Singer Suresh Wadkar | "मागील ११ वर्षांपासून मी हा त्रास सहन करतोय आणि अद्याप ही लढाई संपलेली नाही..."

"मागील ११ वर्षांपासून मी हा त्रास सहन करतोय आणि अद्याप ही लढाई संपलेली नाही..."

googlenewsNext

प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर नुकतेच नाशिक येथे लघुपटाच्या प्रदर्शनासाठी गेले होते. नाशिक येथील पोलीस आयुक्तालयात भूमाफिया या लघुपटाचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी सुरेश वाडकर, पद्मा वाडकर, नाशिक जिल्ह्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडे, निर्माते योगेश कमोद, दिग्दर्शक समीर रहाणे,पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी गायक सुरेश वाडकर यांनी आपल्या बाबतीत जे घडले त्यामुळे मी गेल्या ११ वर्षांपासून हा त्रास सहन करत आहे, असे सांगितले.

एका वेबसाइटच्या रिपोर्टनुसार,  पोलीस आयुक्त दीपक पांडे माझी या त्रासापासून सुटका करतील. या प्रकरणातून तेच मला न्याय मिळवून देतील असा विश्वास मला वाटतो असे सुरेश वाडकर यांनी म्हटले आहे. हे प्रकरण नेमके काय आहे आणि सुरेश वाडकर असे का म्हणाले ते जाणून घेऊयात.

सुरेश वाडकर हे प्रसिद्ध गायक आहेत हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांच्याकडे गाणे शिकण्यासाठी दूरून अनेक मुलं मुली मुंबईला येत असतात. नाशिक येथीलही बऱ्याच मुलामुलींना त्यांच्याकडे गाणे शिकण्याची इच्छा असते. त्यामुळे त्यांनी नाशिकला स्वतःची अकॅडमी सुरू करण्याचे ठरवले. याच कारणास्तव त्यांनी त्यांच्या मित्रावर विश्वास ठेवून नाशिक येथे सुरेश वाडकर आणि सोनू निगम दोघांनी मिळून जमीन खरेदी केली होती. मात्र यात त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यानंतर त्यांनी हे प्रकरण कोर्टात नेले. यात बऱ्याच आर्थिक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले. सोनू निगमने कंटाळून काढता पाय घेतला. दोघांचीही चांगलीच फसवणूक झाली होती. मध्यंतरी देश सोडून जाण्याचा विचारही त्यांच्या मनात आला.


मात्र हा सर्व त्रास जेव्हा संपेल त्यानंतर मी याबाबत विचार करेन असे ते यावेळी म्हणाले. या प्रकरणी मित्राकडूनच त्यांची फसवणूक झाल्यामुळे त्यांनी त्या मित्राविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात मोठमोठे अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या देखील मी संपर्कात होतो मात्र त्यांच्याकडून कुठलेच आश्वासन मला मिळाले नाही. कोर्टकचेऱ्या, जमिनीचा वाद यामुळे मानसिक तानही आला. आजही त्यांना या प्रकरणी न्याय मिळाला नसून त्यांची ही लढाई संपलेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र गेल्या वर्षी मी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांनी मला या प्रकरणात न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्यामुळे माझा ११ वर्षांचा त्रास संपेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही सुरेश वाडकर यांना न्याय मिळवून देऊ असे पोलीस आयुक्त दीपक पांडे म्हणाले.दरम्यान नाशिक शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मोहीम हाती घेतली असल्याचेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: "I have been suffering for the last 11 years and this battle is not over yet ...", Said famous Singer Suresh Wadkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.