"सैराटनंतर मी १९ चित्रपटांना नकार दिला, कारण...", आर्चीच्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 10:55 AM2024-01-12T10:55:29+5:302024-01-12T10:56:01+5:30

'सैराट' चित्रपटात आर्चीच्या वडिलांची भूमिका अभिनेता सुरेश विश्वकर्माने (Suresh Vishwakarma) साकारली आहे. सध्या सुरेश विश्वकर्मा एका मुलाखतीमुळे चर्चेत आले आहेत.

"I turned down 19 films after Sairat, because..." reveals the actor who played Archie's father. | "सैराटनंतर मी १९ चित्रपटांना नकार दिला, कारण...", आर्चीच्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा खुलासा

"सैराटनंतर मी १९ चित्रपटांना नकार दिला, कारण...", आर्चीच्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा खुलासा

२०१६ साली रिलीज झालेला 'सैराट' (Sairat Movie) चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून जास्त गल्ला जमवला आहे. आजही हा चित्रपट आणि त्यातील पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन कायम आहेत. या चित्रपटातील आर्ची आणि परशाची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली. या चित्रपटात आर्चीच्या वडिलांची भूमिका अभिनेता सुरेश विश्वकर्माने (Suresh Vishwakarma) साकारली आहे. सध्या सुरेश विश्वकर्मा एका मुलाखतीमुळे चर्चेत आले आहेत. या मुलाखतीत त्यांनी सैराटनंतर तब्बल १९ चित्रपट नाकारल्याचा खुलासा केला आहे.

सुरेश विश्वकर्मा लवकरच खुर्ची या सिनेमात झळकणार आहेत. सध्या ते या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने ते मुलाखत देत आहेत. नुकतेच त्यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सैराटनंतर तब्बल १९ चित्रपट नाकारल्याचा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, 'सैराटतर मी सलग १९ चित्रपट नाकारले होते. कारण त्यात सतत राजकारणी आणि मुलीचा बाप अशाच पठडीतल्या भूमिका होत्या. सैराट झाल्यानंतर मी अनेक भूमिका त्या पद्धतीच्या साकारल्या. पण नंतर मला सतत त्याच भूमिकांसाठी विचारण्यात येत होते. त्यामुळे मी कंटाळलो होतो. 

वरिष्ठ कलाकारांनी दिला मोलाचा सल्ला

ते पुढे म्हणाले की, मी त्याच त्याच भूमिका का करतो आहे, असे मला सतत वाटत होते. त्यानंतर मी काही वरिष्ठ कलाकारांशी याबद्दल बोललो. त्यावेळी त्यांनी मला एक मोलाचा सल्ला दिला. तुला इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती वर्ष लागली, ते तू मोज. जर तू ते पात्र साकारले नाहीस, तर इतर कोणीतरी हे पात्र साकारणार आहे. सुरेश विश्वकर्मा तुम्ही ही भूमिका करत नाहीत, तर तुम्हाला दुसरी भूमिका देतो, असे कोणीही म्हणणार नाही.

मग माझी चीडचीड कमी झाली

सिनेइंडस्ट्रीला हा शापच आहे की, तुमच्यावर एखाद्या भूमिकेचा ठपका लागला की तुम्हाला त्याच प्रकारच्या भूमिकांसाठी विचारले जाते. मात्र तरीही मी काही दिग्दर्शकांना यात थोडा बदल करा असे सांगितले. मी नाकारलेल्या चित्रपटातील काही चित्रपट केले. मी प्रत्येक भूमिकेत काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करु लागलो आणि त्यानंतर मग माझी चीडचीड कमी झाल्याचे सुरेश विश्वकर्मा यांनी सांगितले.


 

Web Title: "I turned down 19 films after Sairat, because..." reveals the actor who played Archie's father.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.