'मला वडिलांची खूप भीती वाटायची, कारण...', वर्षा उसगावकरांनी सांगितला 'तो' किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 07:00 AM2023-06-28T07:00:00+5:302023-06-28T07:00:07+5:30
Varsha Usgaonkar : वर्षा उसगावकर यांची जुनी मुलाखत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
अभिनेत्री वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांच्याकडं मराठी सिनेसृष्टीतल्या ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून पाहिले जाते. त्यांचा चाहतावर्ग आजही मोठा आहे. त्यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनय कौशल्याची जादू दाखवली आहे. वर्षा उसगांवकर यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. वर्षा उसगावकर यांची जुनी मुलाखत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यात त्यांनी पार्टीला गेल्यावर मी एकटी पडते असे म्हटले आहे. त्यांची ही मुलाखत दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांनी घेतली होती. सध्या या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
या मुलाखतीत वर्षा उसगावकर म्हणाल्या की, शालेय जीवनात मी फार लाजरीबुजरी होते. आजही एखाद्या पार्टीला गेल्यावर मी एकटी पडते. कारण मी फारशी बोलकी नाही. पण मी ज्यावेळी मोठी झेप घेतली तेव्हा मी खऱ्या अर्थाने बोलकी झाले. त्यामुळे आपल्या स्टोरीचा सरळ असा आलेख करता येत नाही.
माझे वडील धीरगंभीर व्यक्तीमत्वाचे होते
यावेळी त्यांनी त्यांच्या वडिलांबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या की, माझे वडील धीरगंभीर व्यक्तीमत्वाचे होते. त्यांची कायमच मला भीती वाटायची. कारण त्यांनी मला कधीही पाहिले की, अभ्यास केलास, गणितात किती मार्क मिळाले असेच प्रश्न विचारायचे. यातही टिकली का लावली नाही, बांगड्या का घातल्या नाही असे प्रश्न विचारायचे. त्यामुळे मला सतत असे वाटायचे की ते जिथे कुठे आहेत तिथे ते नीट असावेत पण घरी नसावेत.
वर्कफ्रंटबद्दल
अभिनेत्री वर्षा उसगावकर बऱ्याच मोठ्या कालावधीपासून चित्रपटात सक्रीय नाहीत. पण सध्या त्या छोट्या पडद्यावर काम करताना दिसत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत त्या माईच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. त्यांच्या या भूमिकेला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. याशिवाय त्या नाटकातही काम करताना दिसत आहेत.