नववर्षाच्या मुहूर्तावर नाट्यरसिकांना खूशखबर, ‘अश्रूंची झाली फुले’ लवकरच रंगभूमीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 12:59 PM2019-04-06T12:59:48+5:302019-04-06T13:00:03+5:30
प्रतिमा कुलकर्णी नाटकाचे दिग्दर्शन करणार असून शैलेश दातार,सीमा देशमुख,उमेश जगताप यांच्या भूमिका असतील.
शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि त्यात प्रामाणिक माणसांची व शिक्षणाची होणारी गळचेपी हा ज्वलंत विषय मांडणारे प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘अश्रूंची झाली फुले’ हे गाजलेले नाटक आता पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. अभिनेता सुबोध भावे हे नाटक रंगमंचावर घेऊन येत आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर सुबोधने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून याबाबची खूशखूबर नाट्यरसिकांना दिली आहे. “आपलं नाणं एकदम खणखणीत वाजतंय, इंटरव्ह्यूय एकदम टॉप, एकदम….” अशारितीने सुरू होणाऱ्या या व्हिडिओतून ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाची माहिती सुबोधनं दिली आहे. या नाटकाचे ५१ प्रयोग सादर होणार आहेत.
प्रतिमा कुलकर्णी नाटकाचे दिग्दर्शन करणार असून शैलेश दातार,सीमा देशमुख,उमेश जगताप यांच्या भूमिका असतील. या कलाकारांच्या नावासह आणि…. असंही नमूद करण्यात आलं असून यांत सुबोधही भूमिका साकारणार आहे असं समजतंय. हे नाटक लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे अशी माहितीही सुबोधने दिली आहे. ‘अश्रूंची झाली फुले’ हे नाटक सर्वप्रथम ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर यांनी त्यांच्या नाट्यसंपदा संस्थेतर्फे १९६६ मध्ये रंगमंचावर आणले होते. स्वत: पणशीकरांनी २००२ पर्यंत या सदाबहार नाटकाचे ११११ प्रयोग सादर करून ते अजरामर केले होते.